Tarun Bharat

एकीच्या बळावर सीमाप्रश्न सोडवू

बेळगुंदी येथे म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांचा निर्धार : सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली;  हुतात्म्यांना अभिवादन

वार्ताहर /किणये

कन्नड सक्तीविरोधी आंदोलनात बेळगुंदी येथील तीन तरुण हुतात्मा झाले होते. त्यांना अभिवादन करण्यासाठी म. ए. समितीचे नेते, कार्यकर्ते सोमवारी बेळगुंदीत मोठय़ा प्रमाणात दाखल झाले होते. हुतात्म्यांना अभिवादन करताना एकीच्या माध्यमातून सीमाप्रश्न सोडवूया, असा निर्धार साऱयांनीच केला. सीमाप्रश्नाची सोडवणूक हीच हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे, असे मनोगत समितीच्या अनेक नेत्यांनी व्यक्त केले. सोमवारी बेळगुंदीत दिसून आलेली कार्यकर्त्यांची उपस्थिती व आक्रमक भूमिकेमुळे तालुक्यात पुन्हा एकदा समितीसाठी नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसून आले.

6 जून 1986 रोजी बेळगुंदी भागात कन्नड सक्तीविरोधी आंदोलनातील नागरिकांवर गोळीबार झाला. यामध्ये भावकू चव्हाण, मारुती गावडा, कल्लाप्पा उचगावकर हे तरुण हुतात्मा झाले. या हुतात्म्यांना सोमवारी बेळगुंदी येथील हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करण्यात आले. हुतात्म्यांचे बलिदान वाया जावू द्यायचे नाही, असाच सर्वांनी यावेळी निर्धार केला.

उपस्थित समितीच्या ज्येष्ठ नेत्यांनी हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. यामुळे संपूर्ण बेळगुंदी परिसर दणाणून गेला होता.

बेळगावात 1 जून 1986 रोजी कन्नड सक्तीविरोधी आंदोलनातील लोकांवर गोळीबार झाला. मात्र येथील सीमाबांधव थांबलाच नाही. हे आंदोलन तीव्र झाले आणि 6 जून 1986 रोजी बेळगुंदीत गोळीबार करण्यात आला. यात तिघेजण हुतात्मे झाले. बेळगावमध्ये असणाऱया राकसकोप धरणाचे बांध फोडून बेळगुंदी भागातील नागरिक आपला तीव्र निषेध व्यक्त करतील, याची भीती तत्कालीन सरकारला वाटली. त्यामुळेच त्यांनी गोळीबार केला. आता आम्हा सीमावासियांची ताकद वाढू लागली आहे. या लढय़ात सर्वांनी यावे, असे मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी सांगितले.

66 वर्षांपासून संघर्ष सुरूच

1956 साली राज्य पुनर्रचना करण्यात आली. त्यावेळी अन्यायाने मराठी बहुभाषिक असलेला भाग तात्कालीन म्हैसूर राज्यात डांबण्यात आला. आम्हा मराठी भाषिकांवर अन्याय झाला. त्याला वाचा फोडण्यासाठी बेळगावमध्ये आंदोलन सुरू झाले. आमचा भाग महाराष्ट्रात सामील करून घ्यावा एवढीच आमची मागणी होती. त्यावेळी कर्नाटक व महाराष्ट्र राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी विशेष बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढावा, असे केंद्र सरकारने सांगितले होते. मात्र तसे झालेच नाही. त्यामुळेच आम्ही 66 वर्षांपासून हा संघर्ष करतो आहे, असे मनोगत माजी आमदार मनोहर किणेकर यांनी व्यक्त केले.

सीमावासियांचे खच्चीकरण करावे, या उद्देशाने बेळगावमध्ये 1986 साली कन्नडसक्ती करण्यात आली. तेव्हापासून आजपर्यंत आम्हाला मराठी परिपत्रके द्या, असे म्हणून आम्ही झगडतो आहे. आता सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे, असे माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी सांगितले.

यावेळी सरस्वती पाटील, मालोजी अष्टेकर, म्हात्रू झंगरुचे, शुभम शेळके, आर. आय. पाटील, शिवसेनेचे प्रकाश शिरोळकर, कृष्णा हुंदरे, बी. डी. मोहनगेकर आदींची भाषणे झाली.

परशराम पाटील, आर. एम. चौगुले, लक्ष्मण चौगुले, अशोक पाटील, सुभाष हदगल, नानासाहेब पाटील, मारुती शिंदे, किरण मोटणकर, जोतिबा उचगावकर, शट्टूप्पा गावडा, परशराम शहापूरकर, मायकल डायस, शिवाजी आमरोळकर, नरेश दातार, भाऊ काकतकर, मल्लाप्पा ढेकोळकर, निंगाप्पा जाधव, पुंडलिक पावशे आदींसह पश्चिम भागातील अनेक कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवाजी शिंदे यांनी केले.

हुतात्म्यांचे रक्त वाया जाणार नाही

आपला लढा लोकशाही मार्गाने गेल्या 66 वर्षांपासून सुरू आहे. न्यायदेवता आम्हाला जरुर न्याय देईल. सीमासत्याग्रही, हुतात्म्यांचे बलिदान वाया जाणार नाही, याचे भान आपण साऱयांनीच ठेवले पाहिजे, असे मनोज पावशे यांनी सांगितले.

Related Stories

सुळगा येथे टिप्पर चालकावर चाकू हल्ला

Patil_p

विजयनगर येथे 10 लाखांची घरफोडी

Omkar B

आरपीडी-बीबीएच्या अंतिम वर्ष विद्यार्थ्यांना निरोप

Omkar B

तूर्तास विजेची दरवाढ टळली

Amit Kulkarni

जि.पं.स्थायी समिती निवडणुकीबाबत भिन्न मते

Patil_p

व्हीव्ही सुपर किंग्स, स्पार्टन संघांची विजयी सलामी

Amit Kulkarni
error: Content is protected !!