Tarun Bharat

किदाम्बी श्रीकांतकडून ली जियाला पराभवाचा धक्का

लक्ष्य सेन, सायना, पुरुष व महिला दुहेरीत भारतीय जोडय़ा पराभूत

वृत्तसंस्था/ ओसाका

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने जपान ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत जागतिक चौथ्या मानांकित मलेशियाच्या ली झी जियाला पराभवाचा धक्का देत दुसरी फेरी गाठली तर लक्ष्य सेन, सायना नेहवाल, महिला व पुरुष दुहेरी तसेच मिश्र दुहेरीतील जोडय़ांना पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला.

माजी अग्रमानांकित के. श्रीकांत गेल्या आठवडय़ात झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये प्रारंभीच पराभूत झाला होता. या धक्क्यातून सावरत त्याने येथील स्पर्धेत पाचवे मानांकन मिळालेल्या ली जियावर 22-20, 23-21 अशी मात करून त्याचे आव्हान संपुष्टात आणले. 37 मिनिटे ही लढत रंगली होती. या दोघांत आतापर्यंत चारवेळा गाठ पडली असून श्रीकांतने त्याला पहिल्यांदाच हरविले आहे. अन्य सामन्यात 21 वर्षीय लक्ष्य सेनला पहिला गेम जिंकूनही जपानच्या जागतिक 21 व्या मानांकित केन्टा निशिमोटोकडून 21-18, 14-21, 13-21 असा पराभव पत्करावा लागला. महिला एकेरीत भारताच्या सायना नेहवाललाही पहिल्या फेरीत पराभूत व्हावे लागले. जपानच्या अग्रमानांकित अकाने यामागुचीने तिला 21-9, 21-17 असे हरविले.

पुरुष दुहेरीत एमआर अर्जुन व धुव कपिला यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. कोरियाच्या चोइ सोल जीयू व किम वोन हो यांच्याकडून ते 21-19, 17-21, 18-21 असे पराभूत झाले. दुसऱया गेममध्ये अर्जुन-धुव यांना मॅचपॉईंटची संधी मिळाली होती. पण ती त्यांनी वाया घालवली.

महिला दुहेरीत गायत्री गोपीचंद व त्रीसा जॉली यांनाही थायलंडच्या सातव्या मानांकित जाँगकोलफन किटिथाराकुल व रविंदा प्रजाँगजय यांच्याकडून 17-21, 18-21 असा पराभव स्वीकारावा लागला. मिश्र दुहेरीत जुही देवांगन व वेंकट गौरव प्रसाद यांना चीनच्या अग्रमानांकित झेंग सि वेइ व हुआंग या किआँग यांच्याकडून 11-21, 10-21 असा पराभव पत्करावा लागला.

श्रीकांत व ली यांच्यातील लढत अतिशय चुरशीची झाली. श्रीकांतने जिगरबाज खेळ करीत 15-11 अशी आघाडी घेतली होती. पण ली जियाला त्याने तीन गेमपॉईंट दिले तेव्हा तो ही आघाडी वाया घालविणार असेच वाटले होते. पण त्याने समतोल ढळू न देता सलग पाच गुण घेत पहिला गेम जिंकून आघाडी घेतली. पहिला गेम गमविल्यानंतर जियाने दुसऱया गेममध्ये जोरदार मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. त्याने 2-0 अशी बढत मिळविल्यानंतर ब्रेकपर्यंत किंचित आघाडी राखली होती. ब्रेकनंतर जियाने 14-11 अशी बढत मिळविली. पण श्रीकांतनेही जोरदार प्रत्युत्तर देत जियावर 18-16 अशी आघाडी घेतली. 20-18 वर असताना श्रीकांत गेम जिंकण्यापासून केवळ दोन गुण मागे होता. पण जियाने दोन मॅचपॉईंट वाचवत स्वतःसाठी गेमपॉईंट मिळविला. पण श्रीकांतने त्याला संधी न देता आवश्यक तीन गुण मिळवित जियाचे आव्हान संपुष्टात आणले.

Related Stories

वॉशिंग्टन सुंदरला कोरोनाची बाधा

Patil_p

हार्दिक पंडय़ाचे षटकारांचे जलद ‘शतक’

Patil_p

ऐच्छिक नेमबाजी शिबीर लांबणीवर

Patil_p

आयर्लंडचा विंडीजवर ऐतिहासिक मालिका विजय

Patil_p

नापोली अंतिम फेरीत, मर्टेन्सचा विक्रमी गोल

Patil_p

मुंबई इंडियन्सच्या विजयाची हॅट्ट्रिक

Patil_p