ऑनलाईन टीम / तरुण भारत :
बहुचर्चित भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (LIC) शेअर्स डिस्काऊंटमध्ये लिस्टींग झाले. त्यानंतरही शेअर्समध्ये घसरण होत असल्याने गुंतवणूकदार निराश झाले आहेत. मात्र, एलआयसी आता आपल्या शेअर्सहोल्डरला गुडन्यूज देणार आहे. एलआयसी लवकरच आपल्या पहिल्या तिमाहीचा अहवाल जाहीर करणार असून, शेअर्सहोल्डरला डिव्हीडंट देणार असल्याची माहिती एलआयसीच्या सूत्रांकडून मिळत आहे.
एलआयसीने बीएसई सोबतच्या पत्रव्यवहारात 30 मे रोजी पहिला तिमाही आर्थिक पाहणी अहवाल जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे. कंपनीच्या व्यवस्थापन मंडळात या अहवालावर चर्चा करण्यात येणार आहे. आयपीओने अपेक्षित कामगिरी न केल्याने गुंतवणूकदारांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे शेअर्सवर डिव्हीडंटची निश्चिती केली जाईल, असे सांगण्यात येते.
एलआयसीचा आयपीओ साईज 20,557 कोटी रुपये होता. तर एलआयसीची मार्केट कॅप 5,24,626.93 कोटी रुपये आहे. तज्ञांच्या मतानुसार एलआयसीच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळत असली तरी एलआयसीकडून गुंतवणूकदारांना फायदा दिला जाऊ शकतो. एलआयसी आयपीओसाठी 902-949 रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला होता. कंपनीचा शेअर बाजारात जवळपास 9 टक्क्यांच्या डिस्काऊंटसह लीस्ट झाला होता. सध्या बीएसईवर एलआयसीचा शेअर 1.59 टक्के वाढीसह 829.85 रुपयांवर टेंड करत होता. पण अजूनही शेअर इशू प्राइजच्या तुलनेत 12.55 टक्क्यांनी खाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये निराशा आहे.