दोन्ही राज्याचे परवाने आवश्यक खाण खात्याकडून सूचना जारी
प्रतिनिधी/ पणजी
गोव्यात वापरासाठी अन्य राज्यातून आणण्यात येणाऱया रेती, खडी, लाल माती यासारख्या गौण खनिजाच्या आयातीसाठी यापुढे संबंधित राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेला वैध परवाना सक्तीचा करण्यात आला आहे. त्याशिवाय गोवा सरकारच्या खाण खात्याचा वाहतूक परवाना असणेही गरजेचे म्हटले आहे.
गोवा गौण खनिज सवलत नियम, 1985च्या नियम 47 नुसार रेती, खडी, लाल माती यासारख्या गौण खनिजांची गोव्यात आयात करण्याच्या दृष्टीने सरकारने सदर आदेश जारी केला आहे. त्याशिवाय तात्पुरती उपाययोजना म्हणून खात्याने अन्य राज्यांकडून देण्यात आलेले वैध परवाने असलेल्या वाहनांना गोवा सरकारचे वाहतूक परवाने जारी करण्यासाठी चेकनाक्यावर वाहतूक विभागाच्या अधिकाऱयांद्वारे तपासणी यंत्रणा ठेवण्यात आली आहे.
दरम्यान, गौण खनिजांच्या वाहतूक परवान्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासंबंधी ऑनलाईन यंत्रणा दि. 27 सप्टेंबरपासून कार्यरत करण्यात येणार आहे. हे परवाने चेकनाक्यावर ऑनलाईन पद्धतीने तसेच व्यक्तीशः अशा दोन प्रकारे दि. 2 ऑक्टोबर पर्यंत जारी करण्यात येणार आहेत. त्यानंतर दुसऱया दिवसापासून केवळ ऑनलाईन पद्धतीनेच देण्यात येतील.
ऑनलाईन वाहतूक परवाने मिळण्यासाठी डीएमजी.जीओए.जीओव्ही.इन या पोर्टलवर अर्ज करता येणार आहेत. अधिक माहितीसाठी पोर्टलवर दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे खाण आणि भूगर्भ खात्यातर्फे कळविण्यात आले आहे.