Tarun Bharat

लेफ्ट. जन. अनिल चौहान देशाचे नवे सीडीएस

Advertisements

जनरल रावत यांच्या निधनानंतर 9 महिन्यांनी नियुक्ती

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

केंद्र सरकारने निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) म्हणून नियुक्ती केली आहे. ते देशातील दुसरे सीडीएस असतील. जनरल बिपिन रावत यांच्या निधनानंतर हे पद रिक्त झाले होते. सीडीएस पदाबरोबरच चौहान हे भारत सरकारच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. चौहान हे उत्तराखंडमधील पौडी-गडवाळ येथील रजपूत कुटुंबातील आहेत.

केंद्र सरकारने पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून त्यांची नियुक्ती केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने बुधवारी सायंकाळी जारी केली. माजी सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाल्यानंतर देशातील हे सर्वात मोठे लष्करी पद 9 महिन्यांपासून रिक्त होते. आता या पदाची जबाबदारी निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सेवानिवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी लष्करातील 40 वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या कारकिर्दीत अनेक कमांड सांभाळल्या आहेत. त्यांना जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील बंडखोरीविरोधी कारवायांचा मोठा अनुभव असल्याचे त्यांच्या नियुक्तीचा तपशील देताना संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.

अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱया

18 मे 1961 रोजी जन्मलेले लेफ्टनंट जनरल अनिल चौहान 1981 मध्ये भारतीय लष्कराच्या 11 गोरखा रायफल्समध्ये दाखल झाले होते. ते राष्ट्रीय संरक्षण अकादमी, खडकवासला आणि इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडूनचे माजी विद्यार्थी आहेत. मेजर जनरलच्या पदावर त्यांनी उत्तर कमांडमधील महत्त्वाच्या बारामुल्ला सेक्टरमध्ये इन्फंट्री (तोफखाना) विभागाचे नेतृत्व केले. त्यानंतर, लेफ्टनंट जनरल म्हणून त्यांनी ईशान्य भारतातील एका कॉर्प्सचे नेतृत्व केले होते. सप्टेंबर 2019 पासून मे 2021 मध्ये सैन्यातून निवृत्त होईपर्यंत ते पूर्व कमांडच्या ‘जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ’ या पदावर कार्यरत होते.

उत्कृष्ट सेवेसाठी अनेक पदके प्राप्त

लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी यापूर्वी अंगोलातील संयुक्त राष्ट्र मिशनमध्येही काम केले आहे. 31 मे 2021 रोजी ते भारतीय लष्करातून निवृत्त झाले. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा आणि सामरिक बाबींमध्ये योगदान दिले. लष्करातील त्यांच्या विशिष्ट आणि सर्वोत्तम सेवेबद्दल परमविशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, सेना पदक आणि विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे.

डिसेंबर 2021 मध्ये रावत यांचा मृत्यू

देशाचे पहिले सीडीएस असलेल्या जनरल बिपिन रावत यांचा तामिळनाडूतील कुन्नूर येथे डिसेंबर 2021 मध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्यासोबत पत्नी मधुलिका रावत यांच्यासह हेलिकॉप्टरमधील 14 जणांना प्राण गमवावे लागले होते. एमआय-17 व्ही5 हे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे अपघातग्रस्त झाले होते.

सीडीएस ः तिन्ही सेनादलांमध्ये ताळमेळ साधण्याची जबाबदारी

सीडीएस पदावर नियुक्त असलेला अधिकारी भूसेना, वायुसेना आणि नौसेना या भारतीय सेनादलांमध्ये परस्पर समन्वय आणि ताळमेळ सुधारण्याची जबाबदारी पार पाडतो. पहिले सीडीएस असलेल्या रावत या सेनाध्यक्षांनी कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तिन्ही सेनादले हातात हात घालून सज्ज ठेवण्यावर भर दिला. तिन्ही सेनादलांचे प्रमुख या नात्याने त्यांच्या अवघ्या दोन वर्षाच्या कालखंडात भारतीय सेनेकडून मोठय़ा प्रमाणात शस्त्रखरेदी करण्यात आली होती. तसेच भारत निर्मित शस्त्रांचे प्रमाणही सेनादलांमध्ये वाढविण्यात त्यांचा पुढाकार होता.

Related Stories

पंजाबला अग्रगण्य राज्याचा दर्जा मिळवून देऊ

Patil_p

५ कोटी ३० लाखांचं बक्षिस असलेल्या मोस्ट वाँटेड आरोपीला दिल्लीत अटक

Archana Banage

देशात मागील 24 तासात निच्चांकी रुग्णवाढ

datta jadhav

”…तर रशिया अण्वस्त्राचा वापर करणार”

Abhijeet Khandekar

पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोकसीला डोमिनिकामध्ये अटक

Tousif Mujawar

दिल्लीत मिळणार मोफत लस; 1.34 कोटी लस खरेदी करणार : अरविंद केजरीवाल

Tousif Mujawar
error: Content is protected !!