Tarun Bharat

जीवन संपते, डेथनोटही मिळते, पण पुढे काय?

Advertisements

आत्महत्येप्रसंगी चिठ्ठी लिखाण, मरणाला कारणीभूत असलेल्यांची नोंद, अक्षर पडताळणीसाठी हस्ताक्षर तज्ञांची मदत

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव शहर व जिल्हय़ात आत्महत्याप्रकरणे वाढत आहेत. प्रत्येकाच्या आत्महत्येला कारणे वेगवेगळी असली तरी जीवन संपविण्याची मानसिकता मात्र एकच असते. आत्महत्या करण्यापूर्वी त्या व्यक्तीने लिहिलेल्या ‘डेथ नोट’ला संपूर्ण प्रकरणाच्या तपासात प्राधान्य दिले जाते. पोलीस घटनास्थळावरून डेथ नोट जप्त करतात. त्याचे पुढे काय होते? याची माहिती बऱयाच वेळा मिळत नाही किंवा दिली जात नाही.

2 सप्टेंबर रोजी साविओ विन्सेंट पिल्लई (वय 28) मूळचा राहणार गणेशनगर-हिंडलगा या तरुणाने नेहरुनगर-मच्छे येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याच्या खोलीतून पोलिसांनी इंग्रजीतून लिहिलेले अडीच पानांचे डेथ नोट जप्त केले. आपल्या मृत्यूला जबाबदार कोण आहे? याची सविस्तर माहिती सावियोने डेथ नोटमध्ये लिहिली आहे.

या घटनेनंतर लगेच 4 सप्टेंबर रोजी रात्री 10.30 ते दुसऱया दिवशी 5 सप्टेंबरच्या सकाळी 8 यावेळेत नेगिनहाळ, ता. बैलहोंगल येथील श्री बसवसिद्धलिंग स्वामीजी (वय 50) या मठाधीशांनी मठात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ‘भक्तहो, माफ करा’ या मथळय़ाखाली त्यांनी लिहिलेल्या दोन परिच्छेदाची डेथ नोट बैलहोंगल पोलिसांनी जप्त केली.

आत्महत्या करण्यापूर्वी स्वामीजींनी आपण कोणतीच चूक केली नाही. आपल्या मृत्यूला आपणच जबाबदार आहोत. कोणाचीही चौकशी करू नका, नेगिनहाळच्या भक्तांनी आपल्या पश्चात मठाची व्यवस्थित देखभाल करावी. जन्मदाती आई मला माफ कर, मठातील मुलांनो मला माफ करा, माझा प्रवास बसव मडिवाळेश्वरांच्या दिशेने’ असे लिहिले होते.

मठाधीशांनी केलेली आत्महत्या आणि त्याआधी लिहिलेले मृत्यूपत्र हे प्रकरण संपूर्ण राज्यात खळबळ माजविणारे ठरले. कारण चित्रदुर्ग येथील प्रसिद्ध मुरुघा मठाधीशांविरुद्ध 26 ऑगस्ट रोजी म्हैसूर येथील नजाराबाद पोलीस स्थानकात विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून पोक्सो कायद्यांतर्गत एफआयआर दाखल झाला. 1 सप्टेंबर रोजी पोलिसांनी स्वामीजींना अटक केली. या मनस्तापातून नेगिनहाळ मठाधीशांनी आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

मुरुघा मठाधीशांना अटक झाली, याचवेळी सत्याक्का व रुद्रम्मा या दोन महिलांचे संभाषण असलेले 9 मिनिटे 32 सेकंदाचा एक ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या ऑडिओतील संभाषणात नेगिनहाळ मठाधीशांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यात आले. या दोन्ही महिलांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नेगिनहाळ ग्रामस्थांनी बैलहोंगल पोलिसांकडे केली होती. तपास सुरू असतानाच बदनामीला घाबरून मठाधीशांनी जीवन संपविले.

त्यांनी आपल्या डेथ नोटमध्ये कोणाचीही चौकशी करू नका, असा उल्लेख केला असला तरी गावकऱयांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्या दोन महिलांचा शोध घेण्यात येत आहे. उपलब्ध माहितीवरून एका महिलेची चौकशीही करण्यात आली आहे. या चौकशीत मठाधीशांबद्दल संभाषणात केलेल्या आरोपांना पुष्टी मिळेल, अशी कसलीच माहिती ती महिला तपास अधिकाऱयांना पुरवू शकली नाही.

आपल्या कुटुंबीयांची काळजी कोण घेणार?

सावियोचे आत्महत्याप्रकरण मात्र याहून वेगळे आहे. पृथ्वी सिंग नामक भाजपचा नेता, कॅम्प पोलीस स्थानकातील काही अधिकारी व पोलीस आणि एका महिलेने केलेल्या आर्थिक पिळवणुकीमुळे आपल्यावर आत्महत्येची वेळ आली आहे, असा स्पष्ट उल्लेख सावियोने केला आहे. आपल्या पश्चात आपल्या कुटुंबीयांची काळजी कोण घेणार? असा प्रश्नही या तरुणाने मृत्यूपत्रात पत्रकारांना उपस्थित केला आहे. सध्या बेळगाव ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

एखाद्या आत्महत्येच्या घटनेनंतर पोलीस मृत्यूपत्र ताब्यात घेतात. त्याची खातरजमा केली जाते. हे डेथ नोट आत्महत्या करणाऱया व्यक्तीनेच लिहिले आहे का? याची खात्री करण्यासाठी हस्ताक्षर तज्ञांना ते पाठविले जाते. यासाठी संबंधित व्यक्तीने आधी लिहिलेले लिखाण व घटनास्थळी जप्त केलेले डेथ नोट हे दोन्ही बेंगळूर येथील विधिविज्ञान प्रयोगशाळेत पाठविले जाते. तज्ञांनी डेथ नोटमधील अक्षरे जुळत असल्याचा अहवाल दिला तर पुरावा म्हणून तो न्यायालयात हजर केला जातो. अनेक प्रकरणात अशी प्रक्रिया केली जाते.

आत्महत्या करणाऱया व्यक्तीने आपल्या या परिस्थितीला जबाबदार कोण? याचा उल्लेख आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणी लिहून ठेवलेले असते. डेथ नोट त्याच व्यक्तीने लिहिले आहे, हे एकदा सिद्ध झाले तर आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी संबंधितांवर एफआयआर दाखल केले जाते. नेगिनहाळ मठाधीश व सावियोच्या आत्महत्येनंतर डेथ नोटचा मुद्दा सध्या ठळक चर्चेत आला आहे.

अनेकवेळा डेथ नोट पोलिसांच्या पथ्यावर

अनेकवेळा आत्महत्या केलेल्या व्यक्तीने लिहिलेली डेथ नोट पोलिसांच्या पथ्यावर पडते. त्याचा गैरवापर करून डेथ नोटमध्ये नावे असलेल्या संशयितांशी हातमिळवणीही केली जाते. यासाठी आपल्या हाती डेथ नोट पडलेच नाही किंवा तसा कोणताही पुरावा सापडला नसल्याचे स्पष्टीकरण दिले जाते. यासाठी कुटुंबीयांनी कडक भूमिका घेऊन त्याचा पाठपुरावा केला नाही तर ज्यांच्यामुळे माणूस आत्महत्या करतो त्यांच्यावर कारवाई तर दूरच उलट ते उजळ माथ्याने समाजात वावरतात.

तकलादू कारणे देऊन अनेकवेळा  प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न

आत्महत्या करणाऱया व्यक्तीने आपण कोणत्या कारणासाठी जीवन संपवित आहोत, याचा उल्लेख डेथ नोटमध्ये केला असेल तर तपास अधिकाऱयांना एका निर्णयाप्रत येणे शक्मय होते. नहून पोलीस खात्याकडून अनेक तकलादू कारणे देऊन  प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न होतो. यामध्ये ‘पोटदुखीला कंटाळून’, ‘मधुमेह व उच्चरक्तदाब’, ‘कंबरदुखी व गुडघेदुखी’, ‘कर्जाला किंवा व्यसनाला कंटाळून’ अशा कारणांचा समावेश असतो. अमावास्या किंवा पौर्णिमेदरम्यान एखाद्याने आत्महत्या केली तर त्या व्यक्तीला ‘वाऱयाचा त्रास होता’ म्हणून तिने आत्महत्या केल्याचा उल्लेख करून मूळ मुद्दय़ालाच बगल देण्याचा प्रयत्न अनेकवेळा तपास यंत्रणा करते.

Related Stories

वाढदिवसाच्या माध्यमातून आपुलकीची माणसे जवळ येतात

Patil_p

आंतरराज्य बससेवा वारंवार विस्कळीत

Amit Kulkarni

अटक केलेल्या कार्यकर्त्यांची कारागृहात रवानगी

Patil_p

जीव धोक्यात घालून शिक्षण घेण्याची वेळ

Amit Kulkarni

रिक्षा चालकाच्या मुलाने मिळविले घवघवीत यश

Patil_p

ई-केवायसीसाठी 31 पर्यंत अंतिम मुदत

Amit Kulkarni
error: Content is protected !!