Tarun Bharat

पत्नीसह प्रियकराला जन्मठेप

न्यायालयाच्या निकालावर पूर्ण समाधानी – ऍड. अजित भणगे : निकालावर भाष्य करणे योग्य नाही – ऍड. वीरेश नाईक

प्रतिनिधी/ओरोस

अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या विजयकुमार गुरव खून खटल्याचा निकाल लागला असून सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाने मयताची पत्नी आरोपी जयलक्ष्मी गुरव आणि तिचा प्रियकर सुरेश चोथे यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

कोल्हापूर जिल्हय़ातील गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथील पेशाने शिक्षक असलेल्या विजयकुमार गुरव यांचा त्यांच्या राहत्या घरी 6 नोव्हेंबर 2017 च्या रात्री खून झाला होता. त्यानंतर 12 नोव्हेंबर 2017 रोजी विजयकुमार यांचा मृतदेह सिंधुदुर्ग जिल्हय़ातील आंबोली येथील कावळेसाद दरीत आढळला होता. या प्रकरणी पोलिसांनी मयत विजयकुमार यांची पत्नी जयलक्ष्मी गुरव आणि तिचा प्रियकर सुरेश चोथे यांना अटक केली होती.

फेब्रुवारी 2018 मध्ये दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांच्या न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत तब्बल साडेपाच वर्षानंतर 25 ऑगस्ट 2022 रोजी न्यायालयाने समोर आलेल्या साक्षी पुराव्यांच्या आधारे या दोन्ही आरोपींना दोषी ठरवले होते. 26 रोजी न्यायालयाने दोन्ही बाजूचे वकील आणि आरोपी यांचे शिक्षेबाबतचे म्हणणे ऐकून घेतले होते. दोन्ही आरोपींनी कमीत कमी शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी न्यायालयाला केली होती. त्यानंतर न्यायालयाने याबाबतचा निकाल राखून ठेवत तो सोमवार, दि. 29 रोजी देणार असल्याचे जाहीर केले होते.

महाराष्ट्रात गाजलेल्या या खून प्रकरणाच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होते. सोमवारी दुपारी 12 वाजण्याआधीच दोन्ही आरोपींना कडेकोट पोलीस बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आले. न्यायालयाने दीड वाजता निकाल जाहीर केला.

दोन्ही आरोपींना भा. दं. वि. कलम 302 (खून करणे) सह 34 (संगनमत) नुसार जन्मठेप, प्रत्येकी तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 15 दिवस साधी कैद. तर भा. दं. वि. कलम 201 (पुरावा नष्ट करणे) नुसार दोन्ही आरोपींना दोन वर्षे सक्तमजुरी, प्रत्येकी एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास 12 दिवस साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. तर अटक झाल्यापासून आतापर्यंत जेवढे दिवस ते कारावासात होते, तेवढा कालावधी एकूण शिक्षेतून वजा करण्यात आला असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात एक महिन्याच्या आत अर्ज करणे शक्य आहे. आपण उच्च न्यायालयात अपिल करू शकता, असेही न्यायाधीश हांडे यांनी सांगितले.

विजयकुमारच्या नातेवाईकांना हुंदका अनावर
विजयकुमार यांच्या नातेवाईकांनी या दोन्ही आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती. न्यायालयाने जन्मठेपेच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करताच न्यायालयात उपस्थित असलेल्या नातेवाईकांना (बहिणी, भाचे व अन्य) हुंदका अनावर झाला. आपल्याला न्याय मिळाल्याच्या भावनेने त्यांनी न्यायालयातच आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तर न्यायालयाबाहेर बोलताना ‘न्यायदेवतेचा विजय असो’, ‘विजय गुरव अमर रहे’, ‘ऍड. भणगे यांचा विजय असो’, अशा घोषणा दिल्या.

निकालाबाबत पूर्ण समाधानी – विशेष सरकारी वकील अजित भणगे
न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत आपण पूर्णपणे समाधानी असल्याची प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील अजित भणगे यांनी निकालानंतर पत्रकारांशी बोलताना दिली. हा संपूर्ण गुन्हा परिस्थितीजन्य पुराव्यावर अवलंबून होता. तपासिक अंमलदार, अन्य पोलीस यांनी घेतलेली मेहनत, साक्षीदार शिंत्रेसह अन्य साक्षीदारांची साक्ष रेकॉर्ड झाली. त्यामुळे या प्रकरणात पुराव्याची कडी सिद्ध करू शकलो. यासाठी ज्या-ज्या लोकांनी मदत केली, ती सरकार पक्षाची जमेची बाजू ठरली, असेही ऍड. भणगे यांनी यावेळी सांगितले. यावेळी ऍड. मिहीर भणगे, ऍड. केयुर काकतकर, ऍड. सुनील मालवणकर, ऍड. स्वप्ना सामंत आदी उपस्थित होते.

निकालावर भाष्य करणे योग्य नाही – ऍड. वीरेश नाईक
विधीसेवा प्राधिकरण नियुक्त असलेले आरोपींचे वकील वीरेश नाईक यांनी निकालावर भाष्य करणे योग्य होणार नसल्याची प्रतिक्रिया दिली. दरम्यान अद्याप निकालाची प्रत हाती आलेली नाही. ती मिळाल्यानंतर वरील न्यायालयात अपिल करावे किंवा करू नये, याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी तरुण भारतशी बोलताना स्पष्ट केले.
डोळस न्यायदान – सरला गुरव
न्यायालयाने अतिशय डोळसपणाने न्यायदान केले असल्याची प्रतिक्रिया मयत विजयकुमार यांची बहिण सरला गुरव यांनी दिली. तीन पिढय़ा शिक्षकांचा वारसा असलेल्या या आदर्श कुटुंबाची या महिलेमुळे वाताहात झाली. शासनाने यांना कोणतीही सवलत देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. तसेच मुलांनी बापाला बाप न मानता ते फितूर झाले, याबाबत खंत व्यक्त केली. तर भडगाव ग्रामस्थ, परिवार, साक्षीदार तसेच ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले, त्या सर्वांचे गुरव कुटुंबीय ऋणी असल्याची भावना व्यक्त केली.
वैशाली गुरव
गुरव कुटुंबियांसाठी हा भाग्याचा दिवस असल्याची प्रतिक्रिया वैशाली गुरव (भाची) यांनी दिली. मनासारखा निकाल न्यायदेवतेने दिला आहे. मात्र भविष्यातही अशा निर्दयी माणसांच्या भावनांचा विचार करू नये. समाज सत्याच्या पाठी उभा राहिला. त्यामुळे सत्याचाच अखेर विजय झाला, असेही त्यांनी सांगितले.
जन्मठेपेच्या शिक्षेची मुदत किती? आरोपींचा सवाल
शिक्षा सुनावल्यानंतर आरोपी चोथे याने शिक्षेची मुदत किती आहे, ते सांगा अशी विनंती न्यायालयाला केली. यावर बोलताना या शिक्षेला आजन्म कारावास असे संबोधलेले नाही. जन्मठेपेची शिक्षा ही साधारणपणे 20 वर्षांचा कालावधी गणला जातो. पुढे जाऊन आरोपीचे वर्तन चांगले असल्यास त्यांना शिक्षेत सवलत मागण्याचा अधिकार पोहोचत असल्याचे न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी सांगितले.

Related Stories

काय आहे प्लाझ्मा थेरपी ?

Archana Banage

कोल्हापूर : कोरोना रूग्णांसाठी रिक्षा ऍम्ब्युलन्स सेवा

Archana Banage

पतीसह दोन मुलांना विष घालून मारण्याचा प्रयत्न

Archana Banage

इचलकरंजीतील ‘त्या’ कोरोना बाधित बालकाची प्रकृती स्थिर

Archana Banage

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या ७१० वर

Archana Banage

शहीद जवान संग्राम पाटील यांच्या पार्थिवावर उद्या होणार अंत्यसंस्कार

Archana Banage