वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात आवळला होता गळा; मुलगी झाली म्हणून नाराज होवून केले होते कृत्य
सांगली प्रतिनिधी
मुलगी झाल्याने नाराज होऊन अवघ्या तीन दिवसाच्या नवजात बाळाचा दुपट्टयाने गळा आवळून खून केल्याप्रकरणी या बाळाची आई सुमित्रा गंगाप्पा जट्टी (वय 30, रा. करगुट्टी, यल्लापूर, ता. हुक्केरी, जि. बेळगाव ) हिला जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. एल. मनवर यांनी जन्मठेप आणि दोन हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. ही खुनाची घटना सांगलीतील वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात घडली होती.
याबाबत या खटल्याची अधिक माहिती अशी, आरोपी सुमित्रा जुट्टी ही कर्नाटकातून महाराष्ट्रात येवून सांगलीतील वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयामध्ये बाळंतपणासाठी दाखल झाली होती. तिला मुलगी झाल्याचे कळल्यापासून ती नाराज होती. मुलगी झाली म्हणून तिने दिनांक 18 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास या नवजात स्त्राr जातीच्या अर्भकाचा गळा आवळून खून केला. या प्रकरणांमध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने तात्काळ या मातेस अटक करण्यात आली होती. तसेच या मातेने गळा दाबल्याचे पोलिसांना सांगितले होते. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे दहा साक्षीदार तपासण्यात आले होते. त्यामध्ये रोशनी कौशल शिंदे ही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती. तिने आरोपी लहान बाळाचा गळा आवळत असताना पाहिले. सदरची बाब तिने तात्काळ तेथील परिचारिका रुपाली बजंत्री व अन्य परिचारिकांना सांगितली होती. त्यांनी लगेच या नवजात अर्भकास लहान मुलांचे अतिदक्षता विभागात दाखल केले होते. परंतु, डॉ. खोत यांनी उपचार करण्याचा प्रयत्न केला असता उपचारा दरम्यान लहान अर्भक मयत झाले. त्यामुळे या मातेवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी रोशनी शिंदे, डॉ. मधुकर जाधव, रुपाली बजंत्री, शारदा जुट्टी, शब्बीर हुजरे, डॉ. खोत, अश्विनी चौगुले, श्रद्धा आंबळे व तपासी अंमलदार अमितकुमार पाटील यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. खटल्यात सरकारी वकील म्हणून जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले.