सांगली प्रतिनिधी
पूर्वीच्या वादातून बुर्ली (ता. पलूस) येथील गणेश शिखरे या युवकाचा चाकूने भोसकून खून करणाऱया कुणाल चंद्रकांत शिखरे (24, रा. गावठाण भाग, बुर्ली, ता. पलूस ) यास प्रधान जिल्हा न्यायाधीश ए. एस. राजंदेकर यांनी दोषी ठरवून जन्मठेप आणि दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील आरती देशपांडे-साटविलकर यांनी काम पाहिले.
खटल्याची हकीकत अशी, की मयत गणेश शिखरे याच्या बहिणीला आरोपी कुणाल शिखरे याने काहीतरी अपशब्द वापरले होते. त्यावरुन गणेश आणि कुणाल यांच्यात वाद झाला होता. याचा राग कुणालच्या मनात होता. दरम्यान 18 ऑक्टोबर 2018 रोजी गावात निघालेली दुर्गामाता मिरवणूक पाहण्यासाठी कुणालने गणेश यास बोलवून घेतले. बुर्ली येथील मदने चौकात आल्यावर पुन्हा दोघांत वाद झाला. काही कळायच्या आत आरोपी कुणाल याने त्याच्याजवळील चाकू काढून तो गणेश याच्या पोटात भोसकला आणि तेथून पळून गेला. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच गणेश याचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद मयत गणेश याचा भाऊ अविनाश याने पलूस पोलीस ठाण्यात दिली. तपासी अधिकारी म्हणून प्रशांत पाटील यांनी काम पाहिले.
सदर खटला सुनावणीस आला असता सरकारपक्षातर्फे चौदा साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि मयताचा भावाचा जबाब महत्वपूर्ण ठरला. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी आणि पुराव्याच्या आधारे न्यायाधीशांनी आरोपी कुणाल शिखरे यास दोषी ठरवून त्यास जन्मठेप आणि 5 हजार रुपये दंड तसेच दंडाची शिक्षा सुनावली.