प्रतिनिधी/ मडगाव
दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश विन्सेंत डिसिल्वा यांच्या न्यायालयाने शनिवारी खून केल्याचा आरोप असलेल्या निमा तमंग या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
आरोपी निमा तवंग हा मूळ नेपाळ देशातील. मात्र खुनाची घटना घडली त्यावेळी आरोपी काणकोण येथे राहात होता.
जन्मठेपेच्या शिक्षेव्यतिरिक्त आरोपीने 50 हजार रुपयांचा दंड भरावा आणि दंडाची ही रक्कम न भरल्यास एक वर्ष कैदेची शिक्षा भेगावी लागेल असेही न्या. डिसिल्वा यांनी आदेशात म्हटले आहे.
खुनाच्या आरोपाबरोबरच हा आरोपी भारतीय दंड संहितेच्या 394 (बळजबरी चोरी) कलमाखाली न्यायालयात दोषी ठरला होता. या गुन्ह्यासाठी आरोपीला 5 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची ही रक्कम न भरल्यास सहा महिने कैदेची शिक्षा भोगावी लागेल असेही न्यायालयाने आदेशात म्हटलेले आहे. वरील दोन्ही शिक्षा आरोपीने एकाचवेळी भोगावयाची आहे.
सरकारी वकील डी. कोरगावकर यांनी सरकारपक्षातर्फे न्यायालयात काम पाहिले. काणकोण पोलीस स्थानकाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी या खून प्रकरणाचा तपास केला होता.
पैशासाठी आरोपीने आपलाच सहकारी रणजीत हिरासिंग (27) याच्या डोक्यावर लाकडी दंडुका हाणून खून केला हाता आणि आरोपी मयताकडे असलेली रक्कम घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला काणकोण रेल्वे स्थानकावर अटक केली होती.