ऑस्ट्रेलियन अभिनेत्रीच्या कारकीर्दीचा गौरव
मोठय़ा अन् छोटय़ा पडद्यावरील क्वीन असे निकोल किडमनला संबोधिले जाते. स्वतःच्या प्रतिभेने अनेकदा प्रभावित केलेल्या निकोलला आता एएफआय जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार मिळविणारी निकोल 49 वी व्यक्ती ठरली आहे. तर हा पुरस्कार प्राप्त करणारी ती पहिली ऑस्ट्रेलियन कलाकार आहे.
निकोल अभिनय, मॉडेलिंग अन् निर्मितीच्या क्षेत्रात सक्रीय आहे. स्वतःच्या प्रतिभेने निकोलने हॉलिवूडमध्ये विशेष स्थान निर्माण केले आहे. बुश ख्रिसमस अन् बीएमस बेंडिट्स या चित्रपटाद्वारे निकोलने 1983 मध्ये स्वतःच्या कारकीर्दीस सुरुवात केली होती. त्यानंतर 1989 मध्ये तिला डेड काल्मद्वारे खरे यश प्राप्त झाले होते.
यानंतर ‘फार अँड अवे’, ‘बॅटमॅन फॉरएव्हर’, ‘टू डाय फॉर’, ‘आईज वाइड शट’, ‘दिस आर्स’ या चित्रपटांद्वारे निकोलने स्वतःची अभिनयक्षमता सर्वांसमोर सादर करत वेगळी ओळख निर्माण केली आहे. निकोलने चित्रपटांसह छोटय़ा पडद्यावरही मोठे नाव कमाविले आहे. तिला अकॅडमी अवॉर्ड, ब्रिटिश अकॅडमी फिल्म अवॉर्ड, प्राइमटाइम एमी अवॉर्ड, गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला आहे.
एएफआय जीवनगौरव पुरस्कार निकोलला पुढील वर्षी लॉस एंजिलिस येथे प्रदान करण्यात येणार आहे. निकोलची व्यक्तिरेखांची निवड नेहमीच वाखाणण्याजोगी राहिली आहे. निकोलला हा पुरस्कार देण्याचा निर्णय अत्यंत योग्य असल्याचे उद्गार एएफआय बोर्डचे विश्वस्त कॅथलीन केनेडी यांनी काढले आहेत.