वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांची घोषणा : कुर्टी वीज खात्यात लाईनमन प्रशंसा दिन साजरा : 101 लाईनमन, साहाय्यकांचा गौरव
प्रतिनिधी /फोंडा
लाईनमन हा वीज खात्यातील महत्त्वाचा घटक आहे. आपला जीव धोक्यात घालून जनतेला तो चोवीस तास सेवा देत असतो. त्यामुळे त्याला नोकरी व जिविताची सुरक्षा मिळाली पाहिजे. राज्यातील लाईनमन व लाईन साहाय्यकांना रु. 15 ते 25 लाखांपर्यंत विमा सुरक्षा व अनेक वर्षे कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱयांना नोकरीची सुरक्षा देण्याची घोषणा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली.
राष्ट्रीय लाईनमन प्रशंसा दिनानिमित्त कुर्टी येथील वीज खात्यामध्ये आयोजित केलेल्या लाईनमन गौरव सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. खात्याच्या विभाग 10 तर्फे सोमवारी कुर्टी वीज खात्यामध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमात 101 लाईनमन व लाईन साहाय्यकांचा गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मुख्य वीज अभियंते स्टीफन फर्नांडिस, कार्यकारी अभियंते पी. पी. भरथन, साहाय्यक अभियंते केशव गावडे, मंगेश नाईक, ज्येष्ठ लाईनमन चंद्रकांत भोई व उमाकांत गावडे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
लाईनमनना सध्या मिळणारी रु. 10 लाखांची वीमा सुरक्षा पुरेशी नाही. त्यात रु. 15 ते 25 लाखापर्यंत वाढ करण्याची तजविज केली जाईल. तसेच अनेक वर्षे कंत्राटी पद्धतीवर सेवेत असलेल्या कर्मचाऱयांना नोकरीच्या सुरक्षेची हमी देणारे विविध पर्याय अवलंबिले जातील. लाईनमन व साहाय्यकांना येत्या काळात कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. तसेच वीज खात्यातील विविध समस्यांचा वेळोवेळी पाठपुरावा करून जनतेला चांगली सेवा देण्याचा आपला प्रयत्न असेल. त्यासाठी खात्यातील कर्मचाऱयांनी आपल्या कामाचे स्वरुप तसेच कौशल्ये शिकून घ्यावीत. खात्याशी निगडीत कायदे नियमांचा अभ्यास करण्याचे आवाहनही मंत्री ढवळीकर यांनी केले.
लाईनमन हा वीज खात्याचा चेहरा : स्टीफन फर्नांडिस
स्टीफन फर्नांडिस म्हणाले, वीज ही जनतेची मूलभूत गरज बनली असून या खात्याचा जनतेशी थेट संबंध येतो. लाईनमन हा या खात्याचा चेहरा आहे. त्याचे काम जिकीरीचे असल्याने त्याला सुरक्षेसंबंधी आवश्यक ती सर्व उपकरणे पुरवण्याचा खात्याचा प्रयत्न आहे. कंत्राटदाराच्या कामाचे अभियंत्यांकडून वेळोवेळी निरीक्षण होणे गरजेचे असून त्याकडे दुर्लक्ष झाल्यास लाईनमनचा जीव धोक्यात येऊ शकतो. सुदिन ढवळीकर यांच्या रुपाने वीज खात्याला न्याय देणारे अनुभवी मंत्री लाभले आहेत. त्यांची कार्यशैली व नेतृत्त्वाखाली येत्या काळात एक उत्कृष्ट खाते म्हणून आम्ही निश्चितच मजल मारु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उमाकांत गावडे यांनी आपल्या तीस वर्षातील सेवेतील अनुभव सांगितले. जनतेला चांगली सेवा देऊन प्रत्येक लाईनमनने वीज खात्याबद्दल एक चांगली प्रतिमा निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले. स्वागत केशव गावडे यांनी केले. मंगेश नाईक यांनी सर्व लाईनमनना सुरक्षेची शपथ दिली. महिला कर्मचाऱयांनी स्वागतगीत सादर केले.