पांडुरंग गावकर यांचे मत : राष्ट्रीय पुस्तक सप्ताहानिमित्त आयोजित ‘बहुभाषिक काव्य वाचन’
प्रतिनिधी /पणजी
साहित्य क्षेत्रात ठसा उमटू पाहणारे व चांगले लिहिणाऱया साहित्यिकांना पुढे आणण्याची गरज आहे. उत्तम लेखन करणारे अनेक कवी, लेखक गोव्यात आहेत परंतु त्यांना पढे येण्यासाठी व्यासपीठ निर्माण करुन देणे आवश्यक आहे. गोव्यातील ग्रामीण साहित्यिक व कवी यांच्यात काहीच कमी नाही पण त्यांनी व्यक्त व्हायला हवे, असे मत ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग गावकर यांनी मांडले.
राष्ट्रीय पुस्तक सप्ताहानिमित्त इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझातर्फे आयोजित केलेल्या बहुभाषिक काव्य वाचन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन पांडुरंग गावकर बोलत होते. यावेळी माधव सटवाणी उपस्थित होते. या काव्य वाचन कार्यक्रमात सर्व कवींनी वेगवेगळ्य़ा विषयांवर काविता सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळवली.
दयाराम पाडलोसकर यांनी ‘तुका एक आमाडी वाऱया म्हाका एक आमाडी, पेजेच्या तोंडाक लावूया थोडीं थोडीं’ ही कविता सादर करुन ग्रामीण साहित्याची परंपरा स्पष्ट केली. कवयित्री सोनिया सीरसाट यांनी हिंदीतून काविता सादर केली.
‘मन माझे चालले दूरदेशी रम्य गावा, सोबतीला नसे कोणी, माझीया स्वप्नांचा ठेवा’
ही ‘स्वप्नातील गाव’ कविता सादर करुन डॉ. शिल्पा डुबळे परब यांनी गावापासून लांब गेलेल्या, अंतरलेल्या मनाची अवस्था व्यक्त केली. उपस्थितांनी या कवितेला भरभरुन दाद दिली.
जवळचा एखादा आपला सहकारी, कुटुंबातील व्यक्त जग सोडून गेल्यानंतर मनाची झालेली अवस्था व निर्माण झालेली पोकळी व्यक्त करताना सारिका अडविलकर ही कवयित्री आपल्या कवितेत सांगते – ‘माणूस निघून जातो तेव्हा पटकून बदलून जातो वर्तमानकाळ, वर्तमानातून लगेच त्याचा होतो उल्लेख भूतकाळात.’
या बहुभाषिक कविता वाचन कार्यक्रमात बहुतेक कविंनी घर, आंगण, कुटुंब, नाती, ग्रामीण लोककला यांचे चित्रण मांडून ग्रामीण साहित्याचा ठसा उमटवला. या कार्यक्रमात सहभागी कवींबरोबरच कालिका बापट यांनीही कविता सादर केली.
इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब यांनी स्वागत केले. कालिका बापट यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.
सहभागी कवी
बहुभाषिक कविता वाचन कार्यक्रमात शोभा फुलकर, दयाराम पाडलोसकर, डॉ. सोनिया शिरसाट, स्मीता भंडारे कामत, सुनिता फडणीस, ऍड. सेलेस्ता घाटवळ, ग्वादालूप डायस, पौर्णिमा केरकर, डॉ. प्रियांका परब, डॉ. शिल्पा डुबळे परब, सारिका अडविलकर, मानसी धावसकर, गौतमी चोर्लेकर यांनी भाग घेतला.