हास्यसम्राट संभाजी यादव यांचे भाष्य : विनोदी-धीरगंभीर किस्से सादर
बेळगाव : समाजातील विविध गंमती जमती, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा, रुढी-परंपरा याबाबत अनेक विनोद आणि धीरगंभीर किस्से सादर करत संमेलनातील चौथ्या सत्रात राधानगरी, कोल्हापूर येथील हास्यसम्राट संभाजी यादव यांनी रसिकांना खळखळून हसविले. आपल्या आजूबाजूला विनोद घडत असतात. आपल्याला ते टिपता आले पाहिजेत, असे सांगत आवाजाची सांगड घालून विनोद सादर केले. अभिनेते दादा कोंडके, अशोक सराफ, श्रीराम लागू, निळू फुले, गणपत पाटील, शरद पवार, अमिताभ बच्चन, अमिन सयानी आदींचे हुबेहूब आवाज काढत टाळ्यांची दाद मिळविली. अलीकडे नैराश्य, तणाव, वैफल्य वाढले आहे आणि त्यातून अनेक जण जीवन संपवू लागले आहेत. यासाठी जीवन आनंदाने जगले पाहिजे. जगण्यासाठी हसा आणि हसण्यासाठी जगा, असे सांगत समाजात घडणाऱ्या विविध विषयांवर भाष्य केले. ऑर्केस्ट्रामध्ये वाजविल्या जाणाऱ्या विविध वाद्यांचा आवाज काढून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. याबरोबरच कुत्रा, पोपट आणि इतर प्राणी-पक्ष्यांचे आवाज हुबेहूब काढले. चित्रपट पाहायला गेलेल्या नवरा-बायकोचा प्रसंग आपल्या विनोदी शैलीतून सादर केला. मोबाईल, टीव्हीपासून महिला आणि विद्यार्थ्यांना दूर ठेवले पाहिजे. यामुळेच टेन्शन वाढू लागले आहे. यावर आवर घालणे गरजेचे आहे. दिवसभर मुलांबरोबर आणि इतरांबरोबर संवाद साधा आणि टेन्शनमुक्त व्हा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. सुशिक्षित आणि अशिक्षित लोकांच्या बोलण्यातून घडणारे विनोद सादर केले. माणसात राहूया, आनंदात राहूया आणि मनाची मशागत करून आनंदी जीवन जगूया, असा संदेश त्यांनी दिला. आभार सूरज कणबरकर यांनी मानले. यावेळी रसिक श्रोते, नागरिक, महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.