शस्त्रक्रियेसाठी वेगळे ऑपरेशन थिएटर : हावेरीतील 19 वषीय युवकावर यशस्वी प्रत्यारोपण
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावच्या डॉ. प्रभाकर कोरे केएलई हॉस्पिटलमध्ये प्रथमच लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. संतोष हजारे, त्यांचे सहकारी डॉ. सुदर्शन चौगुले आणि बेंगळूरच्या
ऍस्टर हॉस्पिटलचे प्रत्यारोपण तज्ञ डॉ. सोनल अस्थाना व अन्य डॉक्टरांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया केली आहे.
याबाबत माहिती देण्यासाठी हॉस्पिटलमध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिदषदेत केएलईचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले, अथणी येथील डॉ. रवी पांगी यांच्या अन्नपूर्णा हॉस्पिटलमध्ये एका व्यक्तीचा ब्रेन डेड झाला. डॉ. पांगी यांनी त्वरित केएलई हॉस्पिटलला संपर्क साधून अवयव दानासंदर्भात चर्चा केली. त्यानंतर लगेच पुढील कार्यवाही होऊन हावेरी येथील 19 वषीय युवकावर त्या व्यक्तीच्या लिव्हरचे प्रत्यारोपण करण्यात आले.
डॉ. पांगी यांनी वेळेवर संपर्क साधून प्रयत्न केल्याने हे प्रत्यारोपण साध्य झाले आहे. अन्य डॉक्टरांनीसुद्धा असाच प्रयत्न करायला हवा, असे डॉ. कोरे म्हणाले. सरकारी आरोग्य योजनांचाही रुग्णांना लाभ मिळतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. संतोष हजारे म्हणाले, लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया तशी गुंतागुंतीची असते. आजपर्यंत बेंगळूर येथे ही शस्त्रक्रिया होत असे. परंतु केएलईमध्ये लिव्हर प्रत्यारोपण व्हायला हवे, ही डॉ. कोरे यांची इच्छा होती. डॉ. पांगी यांनी संपर्क साधल्यानंतर आपण बेंगळूर येथे जाऊन डॉ. सोनल यांच्याशी चर्चा केली. सहकारी आणि नर्सिंग स्टाफला तेथे खास प्रशिक्षण देण्यात आले.
या शस्त्रक्रियेसाठी वेगळे ऑपरेशन थिएटर व आयसीयू विभाग उभारण्यात आला आणि 12 तासांची लिव्हर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. यासाठी डॉ. नेर्ली, डॉ. खानपेठ, भूलतज्ञ डॉ. अरुण, डॉ. माने, डॉ. मंजुनाथ तसेच ऍस्टरचे डॉ. सुदर्शन, डॉ. रूपा, कार्तिक रायचूरकर, डॉ. श्रीनिवास यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले.
ऍस्टर हॉस्पिटलचे डॉ. सोनल अस्थाना यांनी लिव्हरला केवळ मद्यपान किंवा मादक पदार्थांच्या सेवनामुळेच इजा होते असे नाही तर कधी कधी आनुवंशिकतासुद्धा असू शकते. बेळगावच्या केएलई हॉस्पिटलमध्ये सर्व अत्याधुनिक उपकरणे असून आता येथे लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याची सुरुवात झाली आहे, असे स्पष्ट केले. तसेच रुग्णाला रक्ताची गरज भासली नाही, असेही ते म्हणाले.
याच पत्रकार परिषदेत प्रत्यारोपण करण्यात आलेल्या रुग्णांनी देवाचे आणि डॉ. प्रभाकर कोरे यांच्यासह डॉ. हजारे आणि त्यांच्या सर्व सहकाऱयांचे आभार मानून अवयव दानामुळे अनेकांना जीवदान मिळते, असे सांगितले. प्रारंभी वैद्यकीय संचालक डॉ. एम. व्ही. जाली यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
माध्यमांनी अवयवदान चळवळीचा प्रसार करावा
हृदय, किडनी आणि लिव्हरबरोबरच आता केएलईमध्ये लंग्ज प्रत्यारोपण सुरू व्हावे यासाठी आपण केएलईच्या डॉक्टरना प्रशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवत असून माध्यमांनी अवयवदान चळवळीचा प्रसार करावा, अशी अपेक्षा डॉ. प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केली.