व्हिलारेलविरुद्ध रोमांचक उपांत्य लढतीत 5-2 फरकाने नाटय़मय विजय
व्हिलारेल-स्पेन / वृत्तसंस्था
व्हिलारेलविरुद्ध सेमीफायनल फर्स्ट लेगमधील आघाडी गमावल्यानंतर अडचणीत आलेल्या लिव्हरपूलने दुसऱया सत्रातील खेळात 3 धडाकेबाज गोल करत चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत जोरदार धडक मारली. लिव्हरपूलतर्फे दुसऱया सत्रात फॅबिन्होने 62 व्या मिनिटाला, लुईस दियाझने 67 व्या मिनिटाला तर सादिओ मानेने 74 व्या मिनिटाला गोल करत हा सामना जिंकून दिला.
चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने दोन टप्प्यात खेळवले जातात. यातील पहिल्या टप्प्यातील लढतीत लिव्हरपूलने 2-0 अशी आघाडी मिळवली होती. मात्र, येथे दुसऱया टप्प्यातील लढतीच्या पहिल्या सत्रात व्हिलारेलने चक्क 2 गोल नोंदवत लिव्हरपूलच्या अवघ्या पथकात खळबळ उडवून दिली. व्हिलारेलतर्फे अवघ्या तिसऱया मिनिटाला दियाझने तर 41 व्या मिनिटाला प्रॅन्सिस कॉक्यूलिनने गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला. व्हिलारेलच्या या दोन गोलमुळे त्यापूर्वी मजबूत भासणारा लिव्हरपूलचा संघ अचानक अडचणीत आल्याचे स्पष्ट झाले. व्हिलारेलसारखा सामान्य स्पॅनिश क्लब लिव्हरपूलचे सातव्या युरोपियन टायटलचे स्वप्न भंग करणार का, असाही प्रश्न निर्माण झाला. मात्र, अंतिमतः इंग्लिश क्लब लिव्हरपूलसाठी हा किरकोळ धक्का ठरला. दुसऱया सत्रातील 3 महत्त्वपूर्ण गोलनंतर त्यांनी 5-2 असा ऍग्रिगेट विजय संपादन केला.
व्हिलारेलने यापूर्वी या स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत युवेन्टसचे तर उपांत्यपूर्व फेरीत बायर्न म्युनिचचे आव्हान संपुष्टात आणले होते. आता उपांत्य फेरीत लिव्हरपूलला देखील ते धक्का देणार का, याची उत्सुकता होती. मात्र, दुसऱया सत्रात लिव्हरपूलने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ साकारला. लिव्हरपूल अंतिम पोहोचल्यानंतर खेळाडूंनी मॅनेजर जुर्गेन क्लॉपसह त्याचा आनंद साजरा केला. जुर्गेन क्लॉप यांच्यासाठी मॅनेजर या नात्याने ही चौथी चॅम्पियन्स लीग फायनल असणार आहे.