Tarun Bharat

लिझ ट्रस ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान

आज शपथबद्ध होणार ः भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची पिछाडी

लंडन / वृत्तसंस्था

ब्रिटनला सोमवारी नवा पंतप्रधान मिळाला. पंतप्रधानपदाची निवडणूक लिझ ट्रस यांनी जिंकली असून त्या आज मंगळवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.  थेरेसा मे आणि मार्गारेट थॅचर यांच्यानंतर लिझ ट्रस ब्रिटनच्या तिसऱया महिला पंतप्रधान बनल्या आहेत. ट्रस यांनी भारतीय वंशाचे खासदार ऋषी सुनक यांना पिछाडीवर टाकत ही प्रतिष्ठेची निवडणूक जिंकली. लिझ ट्रस यांना 81,326 आणि ऋषी सुनक यांना 60,399 मते मिळाली. भारतीय वेळेनुसार सोमवारी संध्याकाळी 5 वाजता नव्या पंतप्रधानांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तसेच पुढील नियोजित कार्यक्रमांची रुपरेषाही मांडण्यात आली. शपथविधी सोहळा झाल्यानंतर नवीन पंतप्रधान आपल्या मंत्रिमंडळाची नियुक्ती करतील. नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक बुधवार, 7 सप्टेंबर रोजी होणार आहे. यानंतर पंतप्रधान पहिल्यांदा ‘हाउस ऑफ कॉमन्स’ सभागृहात पोहोचतील.

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची महत्त्वपूर्ण निवडणूक जिंकल्यानंतर लिझ ट्रस यांनी देशवासियांना संबोधून औपचारिक भाषण केले. यावेळी त्यांनी आपण एक नवीन योजना मांडणार असल्याचे जाहीर केले. कोरोना महामारीनंतर कर कमी करण्यासाठी आणि ब्रिटिश अर्थव्यवस्था मजबूत करण्याशी संबंधित ही योजना आहे. तसेच आपले सरकार ऊर्जा संकट आणि ‘एनएचएस’वर काम करेल. आम्ही सर्वजण आपल्या देशासाठी काम करू, असेही त्यांनी जाहीर केले.

ब्रिटनच्या नवीन पंतप्रधानपदासाठी जुलैमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर जवळपास दोन महिन्यांपासून ही निवड प्रक्रिया सुरू होती. पूर्वनियोजित निवडणूक कार्यक्रमानुसार सोमवारी ब्रिटनच्या नवीन पंतप्रधानांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पंतप्रधान निवडीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान शुकवारी संपले होते. आता 46 वषीय लिझ ट्रस पंतप्रधान बनल्या आहेत. निवडणूक निकालापूर्वी आलेल्या मतदानपूर्व सर्वेक्षणात ऋषी सुनक हे लिझ ट्रस यांच्या मागे असल्याचे सांगण्यात आले होते. पहिल्या काही फेऱयांमध्ये सुनक यांनी आघाडी घेतली होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात ट्रस यांनी आघाडी घेतल्यामुळे सुनक यांना पराभवाचा सामना करावा लागला.

सरकारला सहकार्य करणार ः ऋषी सुनक

नव्या पंतप्रधानांचे नाव जाहीर होण्यापूर्वी भारतीय वंशाच्या ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतृत्त्वाच्या शर्यतीत आपला पराभव झाल्यास पुढील सरकारला सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच लिझ ट्रस यांच्याकडून पराभूत झाल्यास संसदेचे सदस्य राहण्याची आपली योजना असल्याचे जाहीर केले होते. तसेच कंझर्व्हेटिव्ह सरकारला सर्वप्रकारे पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध असल्याचे स्पष्टीकरणही दिले होते.

बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर सत्ताबदल

बोरिस जॉन्सन यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत भारतीय वंशाचे अर्थमंत्री ऋषी सुनक आणि आरोग्यमंत्री साजिद जाविद यांनी पहिल्यांदा राजीनामा दिला होता. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधून एका दिवसात 39 मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे जॉन्सन यांच्यावर राजीनाम्याचा मोठा दबाव निर्माण झाला होता. त्यानंतर बोरिस जॉन्सन यांनाही राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर ते काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळत होते. मंगळवार, 6 सप्टेंबर रोजी बोरिस जॉन्सन पंतप्रधान म्हणून ‘10 डाउनिंग स्ट्रीट’ या पंतप्रधान निवासामधून आपले शेवटचे भाषण करतील. 

फायरब्रँड नेत्या

लिझ ट्रस यांना ब्रिटिश राजकारणातील फायरब्रँड नेत्या म्हणून ओळखले जाते. दोन महिने चाललेल्या निवडणूक प्रचारात त्यांचा दृष्टिकोन बचावात्मक राहिल्याचे दिसून आले नाही. बोरिस जॉन्सन यांनी 7 जुलै रोजी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर कंझर्व्हेटिव्ह पक्षात त्यांची लढत भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांच्याशी होती. पक्षाच्या सुमारे 1.60 लाख सदस्यांनी मतदान केले. खासदारांच्या मतदानाच्या पाच फेऱयांमध्ये सुनक यांनी लिझ ट्रस यांचा पराभव केला होता, परंतु अंतिम निर्णय या पक्षाच्या सुमारे 1 लाख 60 हजार नोंदणीकृत सदस्यांनी घेतला आहे.

Related Stories

मलेशियाच्या पंतप्रधानपदी इस्माइल सब्री याकोब यांची निवड

Patil_p

तुर्कियेत मिळाला ‘जादुई खिळा’

Patil_p

ऑस्ट्रियात सुधारणा

Omkar B

लादेनचा पाहुणचार करणाऱयांनी उपदेश देऊ नयेत!

Patil_p

भारतीय वंशाच्या डॉक्टराला महत्त्वाचे यश

Patil_p

व्लादिमीर पुतिन यांचा दबदबा कायम! 2036 पर्यंत रशियावर सत्ता गाजवणार

Tousif Mujawar