ब्लादिमीर पुतीन यांचा होता निर्देश ः गोपनीय माहिती लीक
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनच्या माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांचा वैयक्तिक फोन रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्यासाठी काम करत असलेल्या हस्तकांनी हॅक केला होता. हॅकिंगवेळी ट्रस या ब्रिटनच्या विदेशमंत्री म्हणून कार्यरत होत्या. रशियाच्या हस्तकांनी ट्रस यांचे निकटवर्तीय क्वासी क्वार्टेंग यांच्यासोबतच्या मेसेजच्या आदान-प्रदानासह आंतरराष्ट्रीय सहकाऱयांसोबतच्या संभाषणातील ‘गोपनीय तपशील’ प्राप्त केले आहे. क्वार्टेंग हे पुढील काळात ट्रस यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री झाले होते.
मोबाइलवरील मेसेजमध्ये युक्रेन युद्धाविषयी अन्य देशांच्या विदेश मंत्र्यांसोबतच्या चर्चेचा तपशील नमूद होता. तसेच यात शस्त्रास्त्रांच्या पुरवठय़ाचा तपशीलही सामील होता. एक वर्षापर्यंतचे मेसेज रशियाच्या हस्तकांनी हॅक केले होते.
ट्रस यांच्या फोन हॅकिंगचा खुलासा झाल्यावर ब्रिटनमध्ये खळबळ उडाली आहे. ब्रिटन सरकारच्या प्रवक्त्याने यासंबंधी टिप्पणी करण्यास नकार दिला आहे. सायबर धोक्यांपासून बचावासाठी सरकारकडे मजबूत यंत्रणा आहे. यात मंत्र्यांसाठी नियमित सुरक्षा ब्रीफिंग आणि त्यांच्या वैयक्तिक डाटाची सुरक्षा तसेच सायबर धोके कमी करण्याचा सल्ला सामील असल्याचे प्रवक्त्याने म्हटले आहे.
ट्रस यांचा फोन हॅक झाल्याचा सुगावा दोन महिन्यांपूर्वीच यंत्रणांना लागला होता. त्यावेळी ट्रस या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आघाडीवर होत्या. पुढील काळात त्या पंतप्रधान झाल्या होत्या. परंतु मागील आठवडय़ातच त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांनी पद सोडल्यावर ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान झाले आहेत.