ऑनलाईन टीम/तरुण भारत
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करत आहेत. शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकरही (Gajanan Kirtikar) शिंदे गट सामील झाले आहेत. आता विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे ही शिंदे गटात प्रवेश करणार असं बोललं जात आहे. महाराष्ट्रातील महिला अत्याचाराच्या घटनेवर लक्ष घालण्यासाठी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला (Om Birla) यांची भेट घेतली होती. त्या भेटीदरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सुद्धा उपस्थित होते. यांनतर डॉ. नीलम गोऱ्हे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा तास चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली असून गोऱ्हे शिंदे गटामध्ये प्रवेश करणार की काय याबद्दलच्या चर्चांना उधाण आलं. तर नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांशी भेट झाल्याचं मान्य केलं. मात्र ही भेट अचानक झाल्याचं सांगतानाच नेमकं काय घडलं याबद्दलही त्यांनी माहिती दिली.
मुख्यमंत्र्यांची तुम्ही भेट घेतली आहे. या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर ही भेट नेमकी कोणत्या पद्धतीची होती?” असा प्रश्न नीलम गोऱ्हे यांना विचारण्यात आला. त्यावर नीलम गोऱ्हेंनी पहिल्याच वाक्यामध्ये “या भेटीचे उलट-सुलट अर्थ काढण्याची गरज नाही. मुळात तुमच्याकडे जी माहिती आलेली आहे ती वेगळ्या स्वरुपात आलेली दिसते. मी लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या भेटीसाठी गेले होते. ते सध्या मुंबईत आहेत,” असं सांगितलं. तसेच पुढे, “मी जेव्हा तिथे भेटण्यासाठी गेले तेव्हा १० व्या मजल्यावर स्वत: मुख्यमंत्री आणि इतर लोक होते. ते लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला त्यांच्यापाशीच बसलेले होते,” असं नीलम गोऱ्हेंनी सांगितलं.
पुढे बोलताना त्यांनी प्रसारमाध्यमांच्या वृत्तांकनासंदर्भात नाराजी व्यक्त केली. “असं असलं तरी अर्धा तास बंद खोलीच्या आड चर्चा वगैरे अशापद्धतीने बातम्या आल्या तर काय तुमच्याकडे आधार आहे हे कळलं तर मीही त्यावर बोलू शकेल,” असं त्या म्हणाल्या.
“शिंदे गटात जाणार या चर्चेवर बोलताना त्या म्हणाल्या, “तो मुळात योगायोग होता. मी जेव्हा भेटायला गेले तेव्हा मुख्यमंत्री तिथे होते. मुख्यमंत्री होते म्हणून माझी अपॉइटमेंट वगैरे असं कोणी करत नाही. तो भाग असतो व्यवस्थेचा म्हणून ते तिथे बसलेले होते. पण कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही,” असं नीलम गोऱ्हेंनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं.