किरण ठाकुर यांचे प्रतिपादन : लोकमान्य सांगली क्षेत्रीय कार्यालयाच्या 200 कोटींच्या ठेवी उद्दिष्टाचा आनंदोत्सव
प्रतिनिधी /सांगली
लोकमान्य टिळकांची प्रेरणा घेऊन यशस्वीपणे वाटचाल करणारी लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी लोकांच्या विश्वासास पात्र ठरली असून येत्या तीन वर्षात सहकारी क्षेत्रात लोकमान्यला देशात अव्वलस्थानी नेणार असल्याचा विश्वास लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी व्यक्त केला. लोकमान्यच्या सांगली क्षेत्रीय कार्यालयातील सांगली व सोलापूर जिल्हय़ातील 11 शाखांद्वारे 2021-22 या आर्थिक वर्षात 200 कोटींच्या ठेवींचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल रविवारी सांगलीत शानदार आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मान्यवरांची उपस्थिती व अभिषेक काळे यांच्या बहारदार गीतांच्या मैफलीने कार्यक्रम पार पडला.
धामणी रोडवरील खरे क्लब हाऊस येथे रविवारी झालेल्या कार्यक्रमात किरण ठाकुर बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सांगलीतील प्रसिद्ध व्यापारी व चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष मनोहर सारडा उपस्थित होते. लोकमान्यचे माजी अध्यक्ष प्रभाकर पाटकर, संचालक गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू, तरुण भारत सांगली आवृत्तीचे संपादक मंगेश मंत्री यांची उपस्थिती होती.
संचालक पंढरी परब यांनी प्रास्ताविकात लोकमान्यच्या प्रगतीचा आढावा घेतला. श्रीकांत येडूरकर यांनी सूत्रसंचालन केले. लोकमान्यचे विभागीय व्यवस्थापक सुदत्त पाठक यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. सिंकदर जमादार, नगरसेवक लक्ष्मण नवलाई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.