प्रतिनिधी /पणजी
कला आणि संस्कृती संचालनायातर्फे लोकोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले असून, हा लोकोत्सव सोमवारी 30 जानेवारी ते 8 फेब्रुवारी या दरम्यान कला अकादमीच्या दर्यासंगमावर होणार आहे. या लोकोत्सवाचे उद्घाटन सोमवारी 30 रोजी संध्याकाळी सहा वाजता होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्यस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र उपस्थित राहणार असून, खास उपस्थितांमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, गोवा सरकारचे मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, कला आणि संस्कृती खात्याचे सचिव मिनीनो डिसोझा, कला आणि संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप, महापौर रोहित मोन्सेरात, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक क्षेत्र, उदयपूरचे संचालक किरण सोनी गुप्ता उपस्थित राहणार आहेत. यंदाच्या लोकोत्सवात स्थानिक कारागीर, बचत गट आणि खाद्यपदार्थ विव्रेत्यांना लोकोत्सवाचे 400 स्टॉल राहणार आहेत.
दरम्यान, शनिवारी स्टॉल वाटप करण्याच्या प्रक्रियेदरम्यान संस्कृती भवनात प्रचंड गोंधळ उडाला होता. पेमेंट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पाच तासांपेक्षा जास्त वेळ थांबूनही 300 हून अधिक अर्जदारांना कला आणि संस्कृती विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नाकारले आणि औपचारिकता पूर्ण करण्यासाठी रविवारी परत येण्यास सांगितले.