पालकमंत्री सतेज पाटील यांची माहिती
कोल्हापूर / प्रतिनिधी
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित केलेल्या ‘शाहू महाराज कृतज्ञता पर्वासाठी राज्य शासनाने रु. ५ कोटींचे अर्थसहाय्य मंजूर केले असून सदर निधी हा येणाऱ्या वर्षभरामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. यासाठी माझ्यासह ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाठपुरवठा केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सामजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सामजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांचे यासाठी विशेष सहकार्य लाभल्याचे पत्रकात म्हटले आहे.
पत्रकात पुढे म्हंटले आहे की, देशभरात सामजिक परिवर्तन घडविणाऱ्या महान व्यक्तींमध्ये राजर्षी शाहू महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. केवळ २८ वर्षांच्याच्या कारकीर्दीमध्ये महाराजांनी दुरदृष्टीने अनेक महत्वाचे व क्रांतिकारी निर्णय घेतले. समाजकारण आणि प्रशासन यांच्या सर्वांगीण विकासाचा मजबूत पाया, सामाजिक समतेच्या निर्णयांची अमलबजावणी यातून विकासाचे नवे पर्व राजर्षी शाहू महाराजांनी निर्माण केले. म्हणूनच लोकराजा अशी त्यांची ओळख निर्माण झाली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे ६ मे १९२२ रोजी निधन झाले. या घटनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने २८ एप्रिल ते २२ मे पर्यत ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व’ अंतर्गत संपूर्ण जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद केली होती. उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी आम्ही या कार्यक्रमांच्या नियोजनासाठी राज्य शासनाकडून तात्काळ अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली होती.
तसेच राज्य शासनाकडून ५ कोटी निधीची तरतूद व्हावी याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडे पत्राद्वारे मागणी केली होती. त्यानुसार या कार्यक्रमासाठी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, कोल्हापूर यांना ५ कोटीचा निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिली आहे.