Tarun Bharat

सिसोदियांना बजावणार ‘लुकआउट’ नोटीस?

अटकेची टांगती तलवार कायम, आरोपांचे सत्र सुरूच

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहारातील संशयित आरोपी आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरोधात सीबीआय लुकआऊट नोटीस म्हणजेच ‘एलओसी’ जारी करू शकते. तथापि, रविवारी सायंकाळपर्यंत सिसोदिया यांना लुकआउट नोटीस बजावण्यात आली नसल्याची माहिती तपास अधिकाऱयांकडून देण्यात आली. सध्या मद्य धोरणाशी संबंधित अन्य संशयित आरोपींची चौकशी सुरू असून व्यवहार संशयास्पद आढळल्यास कारवाईचा फास घट्ट केला जाऊ शकतो. या प्रकरणामध्ये सिसोदिया यांच्यासोबत आणखी 15 आरोपींचीही नावे समाविष्ट आहेत. लुकआउट नोटीस बजावल्यानंतर हे लोक देश सोडून जाऊ शकणार नाहीत. यासोबतच त्यांच्यावर अटकेची टांगती तलवारही कायम राहणार आहे.

सीबीआयच्या एफआयआरनुसार, मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 120बी, 477ए आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कलम 7 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी, ईडी आयपीसीच्या कलम 120बी आणि पीसी कायद्याच्या कलम 7 या दोन्हींवरील तपासात सामील होऊ शकते. ही दोन्ही कलमे पीएमएलए अंतर्गत गुह्यांमध्ये येतात. अशा प्रकरणांमध्ये ईडी तत्काळ कारवाई करू शकते. मनीष सिसोदिया यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्हय़ानुसार 2 कलमे मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) येतात.

लुकआउटच्या वृत्तानंतर सिसोदियांचे ट्विट

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह अन्य 13 जणांविरुद्ध लवकरच लुकआउट परिपत्रक जारी केले जाऊ शकते, असे सीबीआयने रविवारी सांगितले. दिल्ली मद्य धोरण प्रकरणात सिसोदिया आणि इतर आरोपींविरुद्ध नोटीस जारी करण्यात आल्याचे वृत्त यापूर्वी आले होते. या वृत्तानंतर मनीष सिसोदिया यांनी ट्विट केले आहे. “तुमचे सर्व छापे अयशस्वी झाले, काहीही सापडले नाही, एका पैशाचाही गैरवापर झाला नाही, आता तुम्ही सिसोदिया सापडत नाहीत असे समजून लुकआउट नोटीस जारी करत आहात. ही काय नौटंकी आहे? मी दिल्लीत बिनधास्त फिरतोय, सांगा कुठे येऊ?’’ असे ट्विट सिसोदिया यांनी केले आहे.

केजरीवालांकडून टीकास्त्र सुरूच

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही ट्विट करत सरकारवर टीका सुरू ठेवली आहे. ‘सर्वसामान्य जनता महागाईशी लढा देत आहे, कोटय़वधी तरुण बेरोजगार आहेत. सर्व राज्य सरकारांसह केंद्र सरकारने बेरोजगारी आणि महागाईशी लढा दिला पाहिजे. त्याऐवजी ते (भाजप) रोज सकाळी सीबीआय-ईडीचा खेळ सुरू करतात. अशा प्रकारे देशाची प्रगती कशी होणार?’ असा प्रश्न केजरीवाल यांनी केला आहे.

Related Stories

सेन्सेक्स 520 अंकांनी वधारला

datta jadhav

‘अनलॉक’नंतर दिल्लीत महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ

Abhijeet Khandekar

दिल्ली मद्य घोटाळय़ात आणखी एकाला अटक

Amit Kulkarni

अनुच्छेद 370 चा निर्णय ‘ऐतिहासिक’

Patil_p

पाकच्या कबुलीजबाबामुळे काँग्रेसच्या माफीची मागणी

Patil_p

पंतप्रधान मोदींना अमेरिकेचा सर्वोच्च पुरस्कार

Patil_p