मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा व्यवसायिकांना इशारा : प्रतिमा सांभाळली नाही तर व्यवसाय येईल संकटात भरीव योगदान देणाऱयांचा पदक, पुरस्काराने सन्मान
प्रतिनिधी /पणजी
गोवा देशातील सर्जनशील राज्य आहे. राज्यात येणारा पर्यटक हा आधार असून, गोव्याला देशाची प्रथम क्रमांकाची पर्यटन राजधानी बनवायची असेल तर प्रथम पर्यटकांना चांगली वागणूक व सेवा मिळणे गरजेचे आहे. काही घटक येथे येणाऱया पर्यटकांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारणी करतात. काही जणांकडून टॅक्सी व हॉटेलचे दर भरमसाठ आकारण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे भविष्यात पर्यटन व्यवसायाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने पर्यटकांची होणारी लूट आपण सहन करणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला.
गोवा विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित गोवा मुक्तीदिन कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले गोव्याला पहिल्या क्रमांकाचे पर्यटनस्थळ म्हणून दर्जा टिकवायचा असेल तर पर्यटकांशी संबंधित सुविधांसाठी फ्लाइट ते टॅक्सी आणि हॉटेलचे दर नियंत्रित करण्याची नितांत गरज आहे. पर्यटकांची होणारी अवाजवी लूट थांबली पाहिजे. वाहतूक, हॉटेल्स आणि इतर पर्यटकांशी संबंधित असलेले व्यवसाय व व्यावसायिकांनी पर्यटकांना चांगली सेवा न दिल्यास त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागतील. त्यामुळे यापुढे टॅक्सीचालक, हॉटेल व्यावसायिक यांच्याकडून पर्यटकांची लूट झाल्यास आपण खपवून घेणार नाही, असेही ते म्हणाले.
महिलांच्या सबलीकरणावर भर
बेरोजगारी कमी करणे आणि फायदेशीर रोजगारासाठी कौशल्य शिक्षणासह महिलांचे सबलीकरण आणि तरुणांचे सक्षमीकरण ह्या राज्याच्या हिताच्या गोष्टी असून, त्या आम्ही केंद्रस्थानी ठेवल्या आहेत. आम्ही स्वयंपूर्ण गोवा व्हावा, यासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन राज्याचा विकास साधणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री सावंत यांनी गोवा मुक्तीलढय़ात भाग घेतलेल्या स्वातंत्र्यसेनानींचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली.
विविध पदकांनी पोलिसांचा सन्मान
या कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते पोलिस, अग्निशामक दल, सामाजिक संस्था, शेतकरी आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पदक देऊन सन्मानित करण्यात आले. यात विशेष सेवा पदकाने पोलीस उपअधीक्षक किरण पौडवाल यांना गौरविण्यात आले. अधीक्षक अभिषेक धनिया व उपअधीक्षक मनोज म्हार्दोळकर, उपअधीक्षक तुषार वेर्णेकर पोलीस उपनिरीक्षक देऊ माणगावकर, हवलादार संतोष भाटकर, महिला हवालदार छाया गडेकर, पोलीस शिपाई अविनाश नाईक यांना मुख्यमंत्री पोलीस सुवर्णपदक देण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री पदकाने उपनिरीक्षक विठ्ठल माजीक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रॉकी इस्तबेरो, हरसान पटेल, पोलीस हवलदार अमित नाईक यांना गौरविण्यात आले.
अग्निशामक दल जवानांचा सन्मान
अग्निशामक दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल विशेष सेवा पदकाने स्टेशन फायर ऑफिसर रवींद्रनाथ पेडणेकर, सब ऑफिसर रुई फर्नांडिस, ऑपरेटर देवानंद पार्सेकर, लिडिंग फायटर धर्मेंद्र नाईक यांना गौरविण्यात आले. मुख्यमंत्री होमगार्ड सुवर्णपदक अनिल हळदणकर, रिटा राजू, सुनंदा चोपडेकर यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
कृषीरत्न, कृषीभूषण पुरस्कार
कृषी क्षेत्रातील सर्वोच्च कृषी रत्न पुरस्कार रजत प्रभू यांना तर कृषी विभूषण पुरस्कार राजेंद्र देसाई, गास्पर फर्नांडिस यांना देण्यात आला.
पर्यावरणीय शेतीसाठी पुरस्कार
पर्यावरणीय शेतीसाठी विशेष पुरस्कार शेखर पराष्टेकर यांना देण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाच्या संचालिका ज्योती सरदेसाई यांनाही उत्कृष्ट कार्यासाठी गौरविण्यात आले.
अनेकांना समाजसेवा पुरस्कार
उत्कृष्ट समाजसेवक म्हणून चंद्रकांत पंडीत, दामोदर नाईक, दीपेश दळवी, प्रदीप गवंडळकर, अमित सावंत, डॉ. अनिता तिळवे, साईश सातार्डेकर, दिलखुष शेट, राजेश गावकर, संजय शेटकर, ज्योती भगत यांना देण्यात आला. उत्कृष्ट सेवेबद्दल दिव्यांग कर्मचारी रामा पार्सेकर, नीलेश लिंगुडकर, श्रीकृष्ण नाईक, अंकुर काणकोणकर यांनाही गौरविण्यात आले.
बिगर सरकारी संस्थांमधील उत्कृष्ट कार्याबद्दल स्ट्रीट प्रोव्हीडंट ट्रस्ट, मेसर्स लुपीन ह्युमन वेल्फेअर ऍण्ड रिसर्च फाउंडेशन, वेर्णा गोवा यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात अनेक विद्यालयांनी भाग घेत सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोवा मुक्तिलढय़ाच्या माहितीवर आधारीत पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.