Tarun Bharat

राजकीय इच्छाशक्तीअभावी विमानतळाचे नुकसान

खासदारांना निवेदन देऊनही दुर्लक्ष : आता बेळगाव-दिल्ली विमानफेरीही बंद करण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव जिल्ह्याला सक्षम राजकीय नेतृत्व नसल्यामुळे त्याचा परिणाम विकासावर होत आहे. राजकीय इच्छाशक्तीअभावी बेळगाव विमानतळाचे नुकसान होत आहे. नागरिकांनी लोकप्रतिनिधींना निवेदन देऊनदेखील त्याबाबत कोणतीच हालचाल केली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. या धोरणामुळेच बेळगाव-मुंबई, बेळगाव-पुणे व आता बेळगाव-दिल्ली विमानफेरी बंद करण्याचा प्रयत्न होत आहे.

प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे मात्र विमानफेऱ्या बंद केल्या जात आहेत. स्पाईस जेट विमान कंपनीने ऑगस्ट 2022 मध्ये बेळगाव-दिल्ली विमानफेरी सुरू केली. या विमानफेरीला अल्पावधीतच उत्तम प्रतिसाद मिळाल्याने आठवड्यातून तीन दिवस असणारी विमानफेरी दैनंदिन सुरू करण्यात आली. यामुळे दररोज 200 हून अधिक प्रवासी दिल्ली-बेळगाव-दिल्ली असा प्रवास करीत होते.

प्रवासी संख्या उत्तम असतानाही अचानक बेळगाव-बेंगळूर विमानफेरी रद्द करण्यात आली. त्यानंतर बेळगाव-मुंबई विमानफेरी मागील 15 दिवसांपासून बंद आहे. आता बेळगाव-दिल्ली विमानफेरीचे बुकिंग 10 तारीखेनंतर होत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे देशाच्या राजधानीशी जोडला गेलेला संपर्क पुन्हा बंद होणार आहे. यामुळे विमानतळाचे मोठे नुकसान होणार आहे. एका बाजूला हुबळी येथील लोकप्रतिनिधी अधिक सेवा मिळविण्यासाठी धडपड करत असताना दुसरीकडे मात्र बेळगावमधील लोकप्रतिनिधी गप्प आहेत.

नागरिकांनी दिले होते निवेदन

दि. 1 नोव्हेंबरपासून अलायन्स एअरने बेळगाव-पुणे विमानफेरी बंद केली. ही विमानफेरी उडानअंतर्गत मंजूर असतानाही बंद करण्यात आल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. औद्योगिक, वैद्यकीय, व्यापार, शिक्षण याबाबतीत दोन्ही शहरांमध्ये साम्य असल्यामुळे विमानसेवा सुरू ठेवण्याची मागणी नागरिकांनी खासदार मंगला अंगडी यांच्याकडे केली होती. तसेच या मागणीचे निवेदन दिल्ली येथील विमानतळ प्राधिकरणाला पाठविण्यात आले आहे. परंतु यासंदर्भात पुढे कोणतीही हालचाल न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती.

Related Stories

भूमापन खात्याच्या अधिकारी महिलेला सक्तमजुरी

Amit Kulkarni

कलाच आत्मिक समाधान देवू शकते!

Omkar B

हंगरगा हायस्कूलसाठी कूपनलिकेची खोदाई

Omkar B

सुस्थितीतील रस्त्यांचा विकास करण्याचा सपाटा

Amit Kulkarni

मंथनचे साहित्य संमेलन उद्या

Amit Kulkarni

तालुक्यात घुमला विठूनामाचा गजर

Amit Kulkarni