Tarun Bharat

Ratnagiri : गादी कारखान्याच्या भीषण आगीत लाखोंचे नुकसान

गुहागर-शृंगारतळीतील घटना, सर्व साहित्य खाक; आरजीपीपीएलचा अ ग्निशमन बंब तासाभराने घटनास्थळी

गुहागर वार्ताहर

तालुक्यातील शृंगारतळी-गणेशनगर येथील गादी कारखान्याला गुरुवारी सकाळी 9.45 च्या सुमारास शॉर्टसर्किटने अचानक भीषण आग लागली. या आगीत जीवितहानी टळली असली तरी कारखान्याचे सुमारे 25 लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आरजीपीपीएल कंपनीचा अग्निशमन बंब तब्बल 1 तासाने घटनास्थळी आल्याने सर्व गादी सामान बेचिराख झाले.

शृंगारतळी गणेशनगर येथे विरेंद्र उर्फ भाई चौगुले यांचा गादी कारखाना असून कारखान्याचे बांधकाम पक्क्या सिमेंटचे आहे. गुरुवारी सकाळी 9.45 च्या सुमारास या गादी कारखान्याला शाॅटसर्किटने आग लागली. यावेळी एक कामगार मशीनवर काम करत होता. त्याने आग आटोक्यात आणण्याचा व सामान बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र गादीसाठी लागणारा तातडीने पेट घेणारा कच्चा माल असल्याने आग कमी वेळात भडकल्याने आगीवर नियंत्रण आणणे अशक्य बनले.

या आगीत कच्च्या मालासह संपूर्ण कारखान्याची इमारतच आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. प्रसंगावधान राखत परिसरातील वीजजोडण्या बंद करण्यात आल्या. दाभोळच्या आरजीपीपीएलच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आले. मात्र तो 1 तासाने आला. तोपर्यंत कारखान्यातील सामान बेचिराख झाले होते. ही आग आटोक्यात आणण्यासाठी शृंगारतळीतील अनेक नागरिकांनी प्रयत्न केले. पाण्याचे फवारणे मारण्यात आले. मात्र कारखाना वाचू शकला नाही. नंतर बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली गेली. घटनास्थळी गुहागरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्यासह महसूलचे अधिकारी, मंडल अधिकारी, तलाठी, पोलीस आदी उपस्थित होते.

अग्निशमन बंबाबाबत नगर पंचायतीची उदासीनता
गुहागर तालुक्यात कोठेही आगीची घटना घडल्यास आरजीपीपीएलचा बंब मागवण्यात येतो. गुहागर नगर पंचायतीकडे बंब नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. ग्रामपंचायती स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा राबवण्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने नगर पंचायतीने यासाठी पावले उचलण्याची गरज आहे. मात्र आजपर्यंत नगर पंचायतीनेही अग्निशमन बंबासाठी उदासीनता दाखवली आहे.

सकाळी 9.45च्या दरम्यान लागलेली ही आग आटोक्यात आणण्यासाठी अनेक स्थानिक ग्रामस्थांनी प्रयत्न केले. कुणी बादल्या भरुन पाणी आणले, बोअरवेलचे पाईप लावले व पाणी मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अनेकजणांना चटकेही बसले. कारखाना मालकालाही याची झळ बसली. ग्रामस्थांच्या या मदतीचे कौतुक करण्यात आले.

Related Stories

पिस्तुलाचा धाक दाखवून रोकडसह दागिने लुटले

Patil_p

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आज कोकण दौऱयावर

Patil_p

शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

Patil_p

रत्नागिरी (संगमेश्वर) : बहुजन विकास आघाडीचा सबारी इंजिनिअरिंग कंपनीवर धडक मोर्चा

Archana Banage

दोन डोस अटीचा महाविद्यालये सुरू होण्यावर परिणाम

Patil_p

रत्नागिरी जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

Archana Banage