सैबर मुल्ला यांचा दावा : संशयिताविरुद्ध पोलीस तक्रार
प्रतिनिधी /फोंडा
गोवा क्रिकटे संघटनेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील उमेदवार सैबर मुल्ला यांनी आपल्या विरोधात गैरप्रचार करणारे व बदनामीकारक पोस्ट समाज माध्यमांवर अज्ञातांकडून व्हायरल करण्यात आले आहेत. या आक्षेपार्ह पोस्टमुळे आपल्याला अपेक्षिते असलेले मते मिळू शकली नाहीत. त्यामुळे आपण पराभूत झाल्याचा दावा फोंडा येथे पत्रकार परिषदेत त्यांनी केला.
हे आक्षेपाह कृत्य ज्या कुणी केले त्याच्याविरोधात आपण फोंडा पोलिसांत तक्रार नोंदविल्याचे त्यांनी सांगितले. समाज माध्यमांवर टाकलेल्या या पोस्टमध्ये आपण राष्ट्रविरोधी असून पॉप्युलर प्रंट ऑफ इंडियाला निधी पुरवित असल्याचे म्हटले आहे. तसेच आपण हिंदू विरोधात कृती करीत असल्याचेही या पोस्टवर टाकण्यात आले आहे. त्यावर आपला फोटोही टाकण्यात आलेला आहे. जीसीएच्या निवडणुकीत आपण खजिनदार पदासाठी उमेदवारी अर्ज भरला होता व त्यात आपल्याला 44 मते मिळाली. निवडणुकीच्या दोन दिवस आधी हा पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल केल्याने त्याचा आपल्या मतदारांवर नकारात्मक परिणाम झाल्याचे सैबर मुल्ला यांनी सांगितले. या नाहक बदनामीमुळे आपल्याला बराच मानसिक त्रास सोसावा लागला.
यावेळी त्याचे वडिल व गोवा क्रिकेट संघटनेचे माजी खजिनदार अकबर मुल्ला हे उपस्थित होते. अकबर मुल्ला यांनीही हा प्रकार बदनामीकारक असून जे कुणी ते केले त्याच्याविरोधात मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे सांगितले. धार्मिक सलोखा असलेल्या गोव्यात आम्ही शालेय जीवनापासून सर्वांशी मिळून मिसळून वागत आलो आहोत. आपल्या कुटुंबाने नेहमीच धार्मिक व सामाजिक सलोखा जपला असून अशा आक्षेपार्ह पोस्टमुळे समाजात फुट घालण्याचा हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.