वृत्तसंस्था/ अमन (जॉर्डन)
येथे सुरू असलेल्या आशियाई महिलांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या लवलिना बोर्गोहेन तसेच मिनाक्षी, प्रिती आणि परवीन त्याचप्रमाणे अंकुशिता यांनी आपल्या वजन गटातून उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून भारताची पदके निश्चित केली आहेत.
या स्पर्धेत शनिवारी झालेल्या महिलांच्या 75 किलो वजन गटातील लढतीत ऑलिम्पिक कास्यपदक विजेती लवलिनाने कजाकस्तानच्या व्हॅलेटिना खेलाझोवाचा 3-2 अशा गुणफरकानी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. लवलिनाने भारताचे पदक निश्चित केले आहे. आसामच्या लवलिनाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत 69 किलो वजन गटात कास्यपदक मिळवले होते.
भारताच्या अंकुशिता बोरो 66 किलो वजन गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत जपानच्या सुबाता अरेसियाचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळवले. मात्र भारताच्या पूजाला उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कजाकस्तानच्या शेकिमोव्हाकडून 0-5 अशा गुणांनी हार पत्करावी लागली. या स्पर्धेत प्रथमच भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱया मिनाक्षीने 52 किलो वजन गटात, प्रितीने 57 किलो वजन गटात तर परवीनने 63 किलो वजन गटात उपांत्यपूर्व फेरीचे सामने जिंकत भारताची पदके निश्चित केली आहेत. 63 किलो वजन गटात विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत कांस्यपदक मिळवणाऱया परवीनने थायलंडच्या पी. सोमन्युकचा एकतर्फी पराभव केला. तर 52 किलो वजनगटात भारताच्या मिनाक्षीने फिलिपिन्सच्या मॅग्नोचा 4-1 असा फडशा पाडत शेवटच्या 4 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले. 57 किलो वजन गटात भारताच्या प्रितीने उझ्बेकच्या सिटोरावर 5-0 अशी एकतर्फी मात केली. 54 किलो वजन गटात भारताच्या साक्षीला उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चीन तैपेईच्या हुआंगकडून पराभव पत्करावा लागला.
पुरुष विभागात भारताच्या मोहमद हुसामुद्दीन तसेच शिवा थापा, गोविंद सहानी, अनंता, अमितकुमार, यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. सदर स्पर्धा 12 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे.