आयपीएल साखळी फेरीत राजस्थान रॉयल्सविरुद्ध मुकाबला आज, बेबॉर्न स्टेडियमवर उभय संघात रंगतदार लढत अपेक्षित
नवी मुंबई / वृत्तसंस्था
मागील सामन्यात पराभवाचा धक्का बसलेल्या लखनौ सुपर जायंट्सचा आज (रविवार दि. 15) राजस्थानविरुद्ध आयपीएल साखळी सामन्यात मुसंडी मारण्याचा प्रयत्न असणार आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर सायंकाळी 7.30 वाजता होणाऱया या लढतीत बाजी मारली तर लखनौचे प्ले-ऑफमधील स्थान निश्चित होईल.
लखनौचा संघ यापूर्वी सलग चार विजयांसह अव्वलस्थानी विराजमान होता. मात्र, मागील लढतीतील विजयासह गुजरातने त्यावर कब्जा केला. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौचा संघ सध्या 16 गुणांसह दुसऱया स्थानी विराजमान असून बाद फेरीपूर्वी आणखी अपयश पत्करावे लागू नये, यासाठी त्यांचे प्रयत्न असतील.
केएल राहुल 12 सामन्यात 459 धावांसह दुसऱया स्थानी विराजमान असून त्याने आतापर्यंत 2 शतके व 2 अर्धशतके झळकावली आहेत. डी कॉकने 12 सामन्यात 3 अर्धशतकांसह 355 धावांचे योगदान दिले तर दीपक हुडानेही 3 अर्धशतकांसह 347 धावा फटकावल्या आहेत.
याचवेळी, राजस्थान रॉयल्सचा संघ मागील लढतीत दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 8 गडय़ांनी पराभव पत्करावा लागला, त्याची भरपाई करण्यासाठी निर्धाराने मैदानात उतरणे अपेक्षित आहे. हा संघ इंग्लंडचा यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलरवर प्रामुख्याने अवलंबून असून बटलरने 12 सामन्यात 3 शतके व 3 अर्धशतकांसह 625 धावांची आतषबाजी केली आहे. त्याचे संघसहकारी मात्र त्याला समयोचित साथ देऊ शकलेले नाहीत.
कर्णधार संजू सॅमसन अद्याप आपल्या लौकिकाला साजेसे प्रदर्शन करु शकलेला नाही. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 12 सामन्यात 2 अर्धशतकांसह 327 धावा केल्या आहेत. 12 सामन्यात 295 धावा करणाऱया देवदत्त पडिक्कलला मागील 2 सामन्यात अनुक्रमे 31 व 48 धावा जमवता आल्याने राजस्थानला दिलासा लाभला आहे. त्याने मोठी खेळी साकारली तर ही बाब संघाच्या पथ्यावर पडेल. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रविचंद्रन अश्विन टॉप स्कोअरर ठरला होता. येथेही त्याचे फलंदाजीतील कौशल्य उपयुक्त ठरु शकते.
प्रतिस्पर्धी संघ
लखनौ सुपर जायंट्स ः केएल राहुल (कर्णधार), मनन वोहरा, इव्हिन लुईस, मनीष पांडे, क्विन्टॉन डी कॉक, रवि बिश्नोई, दुष्मंता चमीरा, मोहसिन खान, मयांक यादव, अंकित रजपूत, अवेश खान, ऍन्ड्रय़्रू टाय, मार्कस स्टोईनिस, कायल मेयर्स, करण शर्मा, कृष्णप्पा गौतम, आयुष बदोनी, दीपक हुडा, कृणाल पंडय़ा, जेसॉन होल्डर.
राजस्थान रॉयल्स ः संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, शिमरॉन हेतमेयर, देवदत्त पडिक्कल, प्रसिद्ध कृष्णा, यजुवेंद्र चहल, रियान पराग, केसी करिअप्पा, नवदीप सैनी, ओबेड मकॉय, अनुनय सिंग, कुलदीप सेन, करुण नायर, ध्रुव जुरेल, तेजस बरोका, कुलदीप यादव, शुभम गरवाल, जेम्स नीशम, नॅथन कोल्टर-नाईल, रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन, डॅरेल मिशेल.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
लखनौच्या अव्वल फलंदाजांविरुद्ध चहलच्या जुगलबंदीची उत्सुकता
राजस्थान रॉयल्स पुन्हा एकदा फिरकीपटू यजुवेंद्र चहलवर अवलंबून असेल, हे सुस्पष्ट आहे. चहलने आतापर्यंत 12 सामन्यात 23 बळी घेतले असून येथे केएल राहुल, क्विन्टॉन डी कॉक यांच्यासह अन्य अव्वल फलंदाजांविरुद्ध त्याची जुगलबंदी रंगणे अपेक्षित आहे. आर. अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा यांची प्रत्येकी 4 षटके देखील विशेष महत्त्वाची असतील. त्या तुलनेत लखनौची गोलंदाजी मात्र काहीशी कमकुवत असून बटलर अँड कंपनीला रोखण्यासाठी अवेश खान व जेसॉन होल्डर यांना मुख्य आघाडी सांभाळावी लागेल. टायटन्सविरुद्ध 4 षटकात 18 धावात 1 बळी, असा किफायतशीर मारा करणारा मोहसिन खान पुन्हा एकदा उपयुक्त योगदान देणार का, यावरही बरेच काही अवलंबून असेल.