केएल राहुल, दीपक हुडाची अर्धशतके, मोहसिनचे 4 बळी
वृत्तसंस्था/ मुंबई
कर्णधार केएल राहुलचे शानदार अर्धशतक व फारसा परिचित नसलेला उत्तरप्रदेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसिन खानने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर लखनौ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सचा 6 धावांनी पराभव करून आयपीएलमधील सातवा विजय मिळविला. दिल्लीला मात्र पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले.
प्रथम फलंदाजी निवडल्यानंतर लखनौने निर्धारित 20 षटकांत राहुल व दीपक हुडा यांच्या अर्धशतकांमुळे 3 बाद 195 अशी भक्कम धावसंख्या उभारली. त्यानंतर मोहसिन खानने केलेल्या भेदक माऱयामुळे दिल्लीच्या हातात येऊ पाहत असलेली बाजी निसटली आणि त्यांना 20 षटकांत 7 बाद 189 धावांवर रोखत लखनौने विजय साकार केला. मोहसिनने 16 धावांत 4 बळी टिपले. लखनौचे आता 10 सामन्यांतून 14 गुण झाले असून उर्वरित चारपैकी एक सामना जिंकला तरी त्यांचे प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल. यासाठी 16 गुण मिळविणे आवश्यक आहे.
दिल्लीची स्थिती मात्र अवघड झाली असून 9 सामन्यांतून त्यांचे 8 गुण झाले आहेत. त्यामुळे प्लेऑफ गाठायचे असल्यास त्यांना उर्वरित पाचपैकी 4 सामने त्यांना जिंकणे आवश्यक असेल. त्यांच्या गोलंदाजांचे बचावात्मक धोरण पाहता चार सामने जिंकणे त्यांच्यासाठी फार मोठे आव्हान असेल. कर्णधार रिषभ पंत (24 चेंडूत 42), मिशेल मार्श (20 चेंडूत 37), रोवमन पॉवेल (21 चेंडूत 35) यापैकी किमान दोघांना 60 हून अधिक धावा करण्याची गरज लागेल.
येथील सामन्यात मोहसिनने बॅक ऑफ द लेंग्थ बॉलवर बाऊन्स मिळवित फलंदाजांना अडचणीत आणले. अधूनमधून त्याने यॉर्कर्सही टाकले. त्याने डेव्हिड वॉर्नर (3), पंत, पॉवेल, शार्दुल ठाकुर (1) यांचे बळी मिळविले. पंतला त्याने शॉर्ट व वाईड चेंडू टाकत आपली हुशारी दाखवली आणि पंतला चेंडूपर्यंत पोहोचण्यासाठी भाग पाडत फ्रस्टेट केले. अशाच एका प्रयत्नात पंतचा अंदाज चुकला आणि तो त्रिफळाचीत झाला. पॉवेललाही त्यानेच पंडय़ाकरवी झेलबाद केले. अखेरच्या टप्प्यात कुलदीप यादव (नाबाद 16) व अक्षर पटेल (24 चेंडूत नाबाद 42) यांनी फटकेबाजी करीत विजयासाठी प्रयत्न केले. पण ते शेवटी अपुरे पडले.
राहुल, हुडाची अर्धशतके
तत्पूर्वी, राहुलने दीपक हुडासमवेत डावाची बांधणी करताना दुसऱया गडय़ासाठी 95 धावांची भागीदारी केली. या दोघांनी बऱयापैकी पायाभरणी केली असली तरी अखेरच्या टप्प्यात त्यांच्या फलंदाजांना पाच षटकांत 50 धावांच जमविता आल्या. स्टोइनिसला आक्रमक फटके मारता आले नाहीत, त्याने 16 चेंडूत नाबाद 17 धावा केल्या. राहुल व हुडा यांनी महत्त्वाची भागीदारी करताना दिल्लीच्या स्पिनर्सचा मारा व्यवस्थित खेळून काढला. कुलदीप यादव, ललित यादव, अक्षर पटेल या स्पिनर्सना एकही बळी मिळवता आला नाही. राहुलने 51 चेंडूंच्या खेळीत 4 चौकार, 5 षटकार मारले तर हुडाने 34 चेंडूत 6 चौकार व एक उत्तुंग षटकार ठोकत या मोसमातील तिसरे अर्धशतक नोंदवले. दिल्लीच्या शार्दुल ठाकुरने 3 बळी मिळविले असले तरी तो फलंदाजांसाठी धोकादायक ठरला नाही. सलामीच्या डी कॉकने 23 धावा जमविल्या.
संक्षिप्त धावफलक ः लखनौ सुपर जायंट्स 20 षटकांत 3 बाद 195 ः डी कॉक 23 (13 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार), राहुल 77 (51 चेंडूत 4 चौकार, 5 षटकार), दीपक हुडा 52 (34 चेंडूत 6 चौकार, 1 षटकार), स्टोईनिस नाबाद 17 (16 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), कृणाल पंडय़ा नाबाद 9 (6 चेंडू), अवांतर 17. गोलंदाजी ः शार्दुल ठाकुर 3-40).
दिल्ली कॅपिटल्स 20 षटकांत 7 बाद 189 ः पृथ्वी शॉ 5, वॉर्नर 3, मार्श 37 (20 चेंडूत 3 चौकार, 3 षटकार), पंत 44 (30 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), ललित यादव 3, पॉवेल 35 (21 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), अक्षर पटेल नाबाद 42 (24 चेंडूत 1 चौकार, 3 षटकार), शार्दुल ठाकुर 1, कुलदीप यादव नाबाद 16 (8 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), अवांत 3. गोलंदाजी ः मोहसिन खान 4-16, चमीरा 1-44, बिश्नोई 1-28, के. गौतम 1-23.