आयपीएल साखळी सामन्यात दोन्ही संघ आज आमनेसामने
पुणे / प्रतिनिधी
लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन संघांनी मागील सामने जिंकल्याने आपली विजयी कामगिरी कोण कायम ठेवणार, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष असणार आहे. कोलकाताविरुद्ध लखनौचे पारडे जड ठरु शकते. केएल राहुलच्या धडाकेबाज फॉर्ममुळे लखनौचा संघ प्ले-ऑफमधील बर्थ निश्चित करण्याच्या उंबरठय़ावर पोहोचला आहे.
पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर शनिवारी सायंकाळी साडेसातपासून हा सामना रंगणार आहे. लखनौ चौदा गुणांसह टॉप चारमध्ये आहे. तर, कोलकाता आठ गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. येथे अनुकूल निकाल लागला तर त्यांचीही प्ले-ऑफची आशाअपेक्षा कायम राहील.
लखनौ संघामार्फत राहुलकडून चांगल्या धावा होत आहेत. त्याने आत्तापर्यंत या सिझनमध्ये दहा सामन्यात 2 शतके व 2 अर्धशतकांसह 451 धावा बनवल्या आहेत. त्यामुळे तो ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये दुसऱया क्रमांकावर आहे. त्याच्या साथीला दुसरा सलामवीर क्विन्टॉन डी कॉककडून चांगल्या धावा होत आहेत. यानंतर दीपक हुडा, मार्कस स्टोईनिस, आयुष बदोनी, कृणाल पंडय़ा अशी फलंदाजी आहे. जेसॉन होल्डर याच्यासारखा अष्टपैलू खेळाडू आहे तर अवेश खान, दुष्मंता चमीरा यांच्यासारखे फास्ट बॉलर आहेत. रवी बिश्नोईवर फिरकीची भिस्त असणार आहे.
कोलकात्याकडून सलामवीर ऍरॉन फिंचकडून धावा होणे गरजेचे आहे. यानंतर श्रेयस अय्यर फॉर्ममध्ये असल्याने त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. मधल्या फळीत रिंकू सिंग, नितीश राणा हेही फॉर्मात आहेत. आंद्रे रसेलच्या फॉर्मची चिंता नाइट रायडरला आहे. त्याच्याकडून म्हणावी तशी कामगिरी होताना दिसत नाही. टीम साऊदी, उमेश यादव यांच्यावर फास्ट बॉलिंगची मदार असणार आहे. उमेश यादवने आत्तापर्यंत दहा सामन्यात 15 बळी मिळविले आहेत. तर सुनील नरेन फिरकीची मदार सांभाळणार आहे.
संभाव्य संघ
कोलकाता नाईट रायडर्स ः श्रेयस अय्यर (कर्णधार), ऍरॉन फिंच, अभिजीत तोमर, अजिंक्य रहाणे, बाबा इंद्रजीत, नितीश राणा, प्रथम सिंग, रिंकू सिंग, अशोक शर्मा, पॅट कमिन्स, रसिक दार, शिवम मावी, टीम साऊदी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, अमन खान, आंद्रे रसेल, अनुकूल रॉय, चमिका करुणारत्ने, मोहम्मद नबी, रमेश कुमार, सुनील नरेन, वेंकटेश अय्यर, सॅम बिलिंग्ज, शेल्डॉन जॅक्सन.
लखनौ सुपरजायंट्स ः केएल राहुल (कर्णधार), मनन वोहरा, इव्हिन लुईस, मनीष पांडे, क्विन्टॉन डी कॉक, रवि बिश्नोई, दुष्मंता चमीरा, शाहबाज नदीम, मोहसिन खान, मयांक यादव, अंकित रजपूत, अवेश खान, ऍन्डय़्रू टाय, मार्कस स्टोईनिस, काईल मेयर्स, करण शर्मा, कृष्णप्पा गौतम, आयुष बदोनी, दीपक हुडा, कृणाल पंडय़ा, जेसॉन होल्डर.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
केकेआरसमोर सलामीवीरांच्या खराब फॉर्मची मुख्य चिंता
सलामीवीरांचा खराब फॉर्म ही कोलकाता नाईट रायडर्ससाठी मुख्य चिंता ठरत आली आहे. या हंगामात त्यांनी सलामीला अनेक प्रयोग राबवले. पण, प्रत्येक वेळी त्यांचे बदल अपयशीच ठरत आले आहेत. आजच्या लढतीत ऍरॉन फिंच ही बाबा इंद्रजीत हीच जोडी कायम ठेवली तर त्यांना या उभयतांकडून आक्रमक प्रारंभाची अपेक्षा असेल. 10 सामन्यात 324 धावा जमवणारा श्रेयस अय्यर अद्याप त्याच्या लौकिकाला साजेसा खेळ साकारण्यात यशस्वी ठरलेला नाही. त्यामुळे धावांचा डोंगर रचायचा असेल किंवा धावांचा यशस्वी पाठलाग करायचा असेल तर त्याने मोठी खेळी साकारणे केकेआरसाठी महत्त्वाचे असणार आहे.
नितीश राणा, रिंकू सिंग सामना जिंकून देणारी खेळी प्रत्यक्षात साकारत असल्याने मध्यफळीत केकेआरला तितकी चिंता नाही. विस्फोटक फलंदाजीची क्षमता असलेला आंद्रे रसेल लखनौच्या गोलंदाजी लाईनअपचा समाचार घेण्यासाठी उत्सुक असेल.