नवी मुंबई/ वृत्तसंस्था
आयपीएल साखळी सामन्यात लखनौ सुपरजायंट्स व आरसीबीचे संघ आज (मंगळवार दि. 19) आमनेसामने भिडतील, त्यावेळी केएल राहुल, क्विन्टॉन डी कॉक यांचे अभिजात कौशल्य आणि दिनेश कार्तिक, ग्लेन मॅक्सवेल यांचे ‘फिनिशिंग स्किल’ पणाला लागेल, असा अपेक्षा आहे. यापूर्वी मागील लढतीत लखनौचा संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध तर आरसीबीचा संघ दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजयी ठरला. तीच घोडदौड येथेही कायम ठेवण्याचा उभय संघांचा प्रयत्न असेल. ही लढत सायंकाळी 7.30 वाजता खेळवली जाणार आहे.
गुणतालिकेत दुसऱया स्थानी विराजमान असलेल्या लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध लढतीसाठी मैदानात उतरण्यापूर्वी आरसीबीला आपल्या टॉप ऑर्डरमधील काही त्रुटींवर मार्ग काढणे भाग असेल. कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिस पहिल्या लढतीनंतर तुटून पडण्यात फारसा यशस्वी झाला नसून सहकारी सलामीवीर अनुज रावतला देखील स्थिरावण्यासाठी वेळ लागत आहे. विराट कोहली उत्तम बहरात असल्याचे जाणवत असले तरी तो अद्याप मोठी खेळी साकारु शकलेला नाही. मॅक्सवेलचे आगमन मात्र संघाला बळकटी देणारे ठरले आहे. या ऑस्ट्रेलियन अष्टपैलू फलंदाजाने दिल्लीविरुद्ध 34 चेंडूत 55 धावांचा अर्धशतकी तडाखा देत आपला फॉर्म अधोरेखित केला आहे.
दुसरीकडे, दिनेश कार्तिक देखील एकहाती सामने जिंकून देण्याचे कौशल्य अद्याप बाकी असल्याची प्रचिती देत असून राष्ट्रीय संघात परतण्याची प्रबळ इच्छा त्याने जाहीरपणे बोलून दाखवली आहे. आरसीबीचा संघ गुणतालिकेत पहिल्या चारमध्ये आहे, याचे श्रेय दिनेश कार्तिकला देखील जाते.
इंजिनियरिंगकडून क्रिकेटकडे वळलेला शाहबाज अहमद फलंदाजीत चुणूक दाखवण्यात बऱयापैकी यशस्वी ठरला आहे. गोलंदाजीत जोश हॅझलवूडने दिल्लीविरुद्ध उत्तम मारा केला. हॅझलवूडसह लंकन लेगस्पिनर वणिंदू हसरंगा व डेथ ओव्हर्स स्पेशालिस्ट हर्षल पटेल यांना लखनौच्या मजबूत फलंदाजी लाईनअपला रोखण्यासाठी प्रयत्नशील रहावे लागेल.
संभाव्य संघ
लखनौ सुपरजायंट्स ः केएल राहुल (कर्णधार), मनन वोहरा, इव्हिन लुईस, मनीष पांडे, क्विन्टॉन डी कॉक, रवि बिश्नोई, दुष्मंता चमीरा, शाहबाज नदीम, मोहसिन खान, मयांक यादव, अंकित रजपूत, अवेश खान, ऍन्डय़्रू टाय, मार्कस स्टोईनिस, काईल मेयर्स, करण शर्मा, कृष्णप्पा गौतम, आयुष बदोनी, दीपक हुडा, कृणाल पंडय़ा, जेसॉन होल्डर.
आरसीबी ः फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, वणिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, जोश हॅझलवूड, शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, शेरफेन रुदरफोर्ड, जेसॉन बेहरेनडॉर्फ, सुयश प्रभुदेसाई, चमा मिलिंद, अनिश्वर गौतम, कर्ण शर्मा, डेव्हिड विली, रजत पाटीदार, सिद्धार्थ कौल.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
बॉक्स
मजबूत फलंदाजी हेच लखनौचे बलस्थान
कर्णधार केएल राहुल (235 धावा) स्वतः पुढाकाराने लढत असून लखनौचा संघ प्रारंभापासूनच खऱया अर्थाने सुपरजायंट्स ठरत आहे. राहुलने मुंबई इंडियन्सविरुद्ध हंगामातील आपले पहिले शतक झळकावले आणि आता सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत तो जोस बटलरपाठोपाठ (272 धावा) दुसऱया स्थानी विराजमान आहे.
धडाकेबाज फॉर्ममधील क्विन्टॉन डी कॉक, युवा आयुष बदोनी, विस्फोटक खेळी साकारु शकणारे दीपक हुडा, कृणाल पंडय़ा हे या संघाचे बिनीचे शिलेदार आहेत. जेसॉन होल्डर व मार्कस स्टोईनिस संघात दाखल झाल्यानंतर फलंदाजी व गोलंदाजीत संघ अधिक मजबूत झाला आहे. जलद गोलंदाज अवेश खान व अव्वल फिरकीपटू रवि बिश्नोई यांनी टी-20 क्रिकेटमधील आपला लौकीक येथेही पुरेपूर जपण्याचा प्रयत्न अविरत सुरू ठेवला आहे.