पुणे / प्रतिनिधी :
चालू आयपीलच्या हंगामात अव्वल दोन संघांमध्ये म्हणजेच लखनौ सुपर जायट्स आणि गुजरात टायटनमध्ये मंगळवारी काट्याची टक्कर होणार आहे. मागच्या सामन्यात गुजरातला मुंबईकडून पराभवाचा फटका बसला होता. तर लखनौने कोलकात्याचा पराभव केला होता. त्यामुळे गुजरात परत विजयी ट्रॅकवर येण्यासाठी प्रयत्नशील असेल. तर लखनौ आपला विजयरथ कायम ठेवण्यास उत्सुक असेल.
पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर उद्या (मंगळवारी) सायंकाळी साडेसातपासून सामन्याला सुरुवात होणार आहे. लखनौ 16 गुणांसह चांगल्या रनरेटसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर गुजरात 16 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मागच्या मॅचमध्ये गुजरातने लखनौला अटीतटीच्या सामन्यात पराभूत केले होते. त्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी लखनौ प्रयत्नशील असेल.
लखनौकडून राहुलकडून चांगल्या धा होत आहेत. त्याने आत्तापर्यंत या सिझनमध्ये दहा मॅचमध्ये 451 धावा बनवल्या आहेत. त्यामुळे तो ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या साथीला दुसरा सलामवीर क्विंटन डिकॉकनेही मागच्या सामन्यात आक्रमक अर्धशतक ठोकले होते. तशाच खेळीची अपेक्षा त्याच्याकडून असणार आहे. यानंतर दीपक हुडा, मार्कस स्टॉईनस हे मधल्या फळीत धावा काढत आहेत. आयुष बदोनी, कृणाल पंडय़ा यांना धावा काढण्यासाठी झगडावे लागत आहे. त्यांनीही मधल्या फळीत धावा बनविल्या, तर लखनौला सोपे जाईल. जेसन होल्डर याच्यासारखा अष्टपैलू खेळाडू आहे. तर आवेश खान, दुष्यंत चमिरा, मोहसीन खान यांच्यासारखे फास्ट बॉलर आहेत. रवी बिश्नोईवर फिरकीची भिस्त असणार आहे.
गुजरातचे दोन्ही सलामवीर वृद्धिमान सहा आणि शुभमन गिल चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. दोघांकडूनही धावांचा रतीब घातला जात आहे. त्यानंतर हार्दिक पंडय़ाही या सिझनमध्ये चांगल्या फॉर्मात आहे. या सिझनमध्ये त्याने तीनशेच्यावर धावा केल्या आहेत. डेविड मिलर, अभिनव मनोहर अशी फलंदाजी आहे. तेवतिया आणि रशीद खान हे गुजरातसाठी फिनीशरची भूमिका बजावत आहेत. तर, गोलंदाजीमध्ये महंमद शमी, वरुण ऍरॉन, लॉकी फर्ग्युसन, अल्झारी जोसेफ, यश दयाल यांच्यावर फास्ट बॉलिंगची मदार असणार आहे. तर, रशीदवर फिरकीची जबाबदारी असणार आहे.