पुणे / प्रतिनिधी :
लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकत्ता नाईट रायडर्स (Lucknow Super Giants and Kolkata Knight Riders) या दोन संघांनी मागचे सामने जिंकल्याने आपली विजयी कामगिरी कोण कायम ठेवणार, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. कोलकाताविरुद्ध लखनौचे पारडे जड वाटत आहे.
पुण्यातील गहुंजे (Gahunje, pune) येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर शनिवारी सायंकाळी साडेसातपासून हा सामना रंगणार आहे. लखनौ चौदा गुणांसह टॉप चारमध्ये आहे. तर, कोलकाता आठ गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे.
लखनौ संघामार्फत राहुलकडून चांगल्या धावा होत आहेत. त्याने आत्तापर्यंत या सिझनमध्ये दहा मॅचमध्ये 451 धावा बनवल्या आहेत. त्यामुळे तो ऑरेंज कॅपच्या रेसमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या साथीला दुसरा सलामवीर क्विंटन डिकॉककडून चांगल्या धावा होत आहेत. यानंतर दीपक हुडा, मार्कस स्टॉईनस, आयुष बदोनी, कृणाल पंडय़ा अशी फलंदाजी आहे. जेसन होल्डर याच्यासारखा अष्टपैलू खेळाडू आहे. तर आवेश खान, दुष्यंत चमिरा यांच्यासारखे फास्ट बॉलर आहेत. रवी बिश्नोईवर फिरकीची भिस्त असणार आहे.
कोलकात्याकडून सलामवीर ऍरॉन फिंचकडून धावा होणे गरजेचे आहे. यानंतर श्रेयस अय्यर फॉर्ममध्ये असल्याने त्याच्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. मधल्या फळीत रिंकू सिंग, नितीश राणा हेही फॉर्मात आहेत. आंद्रे रसेलच्या फॉर्मची चिंत नाइट रायडरला आहे. त्याच्याकडून म्हणावी तशी कामगिरी होताना दिसत नाही. टीम साऊथी, उमेश यादव यांच्यावर फास्ट बॉलिंगची मदार असणार आहे. उमेश यादवने आत्तापर्यंत दहा सामन्यात 15 बळी मिळविले आहेत. तर सुनील नरीन फिरकीची मदार सांभाळेल.