50.90 टक्के मते प्राप्त ः बोल्सोनारो यांचा केला पराभव
वृत्तसंस्था/ ब्राझिलिया
लूला डा सिल्वा हे दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठा देश असलेल्या ब्राझीलचे नवे अध्यक्ष असतील. त्यांनी वर्तमान अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना पराभूत पेले आहे. लूला हे डाव्या विचारसरणीच्या वर्कर्स पार्टीचे नेते आहेत. 1 जानेवारी रोजी लूला हे अध्यक्षपद स्वीकारतील, तोपर्यंत बोल्सोनारो हे काळजीवाहू अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत.
30 ऑक्टोबर रोजी अध्यक्षीय निवडणुकीसाठी दुसऱया फेरीतील मतदान पार पडले. लूला डा सिल्वा यांना 50.90 टक्के तर बोल्सोनारो यांना 49.10 टक्के मते मिळाली आहेत. ब्राझीलच्या घटनेनुसार निवडणूक जिंकण्यासाठी कुठल्याही उमेदवाराला कमीतकमी 50 टक्के प्राप्त करावी लागतात. मागील महिन्यात झालेल्या पहिल्या फेरीतील मतदानात लूला यांना 48.4 टक्के तर बोल्सोनारो यांना 43.23 टक्के मते प्राप्त झाली होती.
77 वर्षीय लूला यांनी प्रचारावेळी भ्रष्टाचार संपविण्याचे आश्वासन दिले होते. बोल्सोनारो यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचारा वाढल्याचा आरोप त्यांनी केला होता. आश्चर्याची बाब म्हणजे लूला हे यापूर्वी अध्यक्ष राहिले असून त्यांना भ्रष्टाचारामुळेच पद सोडावे लागले होते. भ्रष्टाचाराप्रकरणी दोषी ठरल्याने 580 दिवस ते तुरुंगात होते. लूला हे यापूर्वी 2003-2010 दरम्यान दोनवेळा अध्यक्ष म्हणून निवडून आले होते.
नव्या सरकारसमोरील आव्हाने
लूला यांच्या नव्या सरकारसमोर आता पर्यावरण संतुलनाचे आव्हान असणार आहे. अमेझॉनच्या जंगलाचा 60 टक्के हिस्सा ब्राझीलमध्ये आहे. जागतिक हवामानाचे संतुलन कायम राखण्यात हे जंगल महत्त्वाची भूमिका बजावत असते. तसेच जागतिक तापमानवाढ रोखण्यात या जंगलाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. परंतु जंगलातील वणवे, जंगलतोड, अवैध खाणकाम इत्यादी कारणांमुळे ब्राझीलला90 वर्षांमधील सर्वात भीषण दुष्काळाला सामोरे जावे लागले आहे. लूला हे पर्यावरण संरक्षणाचे पक्षधर राहिले आहेत. ब्राझीलमध्ये सध्या 3.30 कोटी लोक उपासमारीच्या उंबरठय़ावर आहेत. महागाईमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती खराब झाली आहे.