खानापूर तालुका म. ए. समितीची बैठक : हुतात्म्यांना अभिवादनावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन


खानापूर : सीमालढा निर्णायक स्थितीत आहे. त्यासाठी तालुक्यातील मराठी भाषिकांनी समितीच्या झेंडय़ाखाली एकत्र यावे, तसेच सीमाप्रश्नाचा सखोल अभ्यास असलेला, न्यायालयीन प्रक्रिया जाणणारा, महाराष्ट्रातील नेत्यांशी संपर्क ठेवणारा सर्वसमावेशक असा अध्यक्ष निवडावा, असे आवाहन ज्येष्ठ सीमासत्याग्रही नारायण लाड यांनी अध्यक्षपदावरून बोलताना केले. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक येथील शिवस्मारकात घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नारायण लाड होते.
स्वागत आबासाहेब दळवी यांनी केले. यशवंत बिरजे प्रास्ताविक करताना म्हणाले, एकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तालुक्यात समितीच्या पुनर्बांधणीसाठी विभागवार बैठकांचे नियोजन करणे, तसेच पदाधिकारी नियुक्ती करणे यासह विविध उपक्रम हाती घेण्यासंदर्भात विचार मांडले. प्रथमतः महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांची सीमाप्रश्न उच्चाधिकार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच दिनेश ओऊळकर यांची सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. यावेळी दिगंबर पाटील म्हणाले, समितीची एकी अभेद्य राखूया, खानापूर तालुका म. ए. समितीचा भगवा झेंडा निश्चित फडकेल.
सर्व मराठी भाषिकांनी समितीच्या झेंडय़ाखाली एकत्र राहून सीमावासियांवरील अन्याय दूर करून घेऊ, स्वार्थासाठी राष्ट्रीय पक्षाच्या दावणीला बांधलेल्यांना बाजूला सारुन समितीचा बालेकिल्ला अबाधित राखूया. निवृत्त पोलीस अधिकारी जयंत पाटील यांनी, एकीनंतर समितीच्या वाटचालीसंदर्भात सूचना मांडल्या. वसंत नावलकर यांनी समितीच्या बळकटीसाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन केले. विलासराव बेळगावकर म्हणाले, समितीच्या पराभवामुळे आज मराठी माणूस एकाकी पडला आहे. भविष्यात सर्वांनी एकदिलाने काम करून समितीचा झेंडा पुन्हा फडकूया. बाळासाहेब शेलार, प्रकाश चव्हाण, विठ्ठल गुरव, चंद्रकांत देसाई, अर्जुन देसाई, मुरली पाटील, विशाल पाटील, आबासाहेब दळवी, नारायण कापोलकर, रामचंद्र देसाई यांची भाषणे झाली. यावेळी समितीचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 3 जून रोजी मणतुर्गा येथे विभागवार बैठका घेण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच 1 जून रोजी हुतात्म्यांना अभिवादनासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. मराठीतून कागदपत्रे मिळावीत यासाठी मध्यवर्तीच्यावतीने निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चातही समिती कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले.