प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेचे स्वतंत्र नगरसेवक महेश आमोणकर यांनी भाजपात प्रवेश केला असून मडगावचे आमदार दिगंबर कामत भाजपात प्रवेश करणार असल्याची अटकळ बांधली जात असताना पक्षाने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
गुरुवारी भाजपात प्रवेश केलेले आमोणकर हे मडगावच्या आमदारांचे कडवे टीकाकार बनले होते. त्यांनी कामत यांच्यावर टीका करताना कोणतीही कसर सोडलेली नाही. 2022 ची विधानसभा निवडणूक त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या तिकिटावर आमदार कामत यांच्या विरोधात लढविली होती. नगरसेवक आमोणकर यांनी त्यांच्या समर्थकांसह पक्षाचे वरि÷ नेते आणि मडगावातील नेत्यांच्या उपस्थितीत गुरुवारी पणजीत भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद तानावडे, सरचिटणीस दामू नाईक, नरेंद्र सावईकर, मडगाव मंडळ प्रमुख रूपेश महात्मे, शर्मद रायतूरकर, सुनील नाईक, चंदन नायक आदी नेते यावेळी उपस्थित होते.
मडगाव पालिकेत भाजप गट सर्वांत मोठा
भाजपने स्वतंत्र नगरसेवक महेश आमोणकर यांना पक्षात घेतल्याने मडगाव पालिकेत त्यांच्याशी संलग्न पॅनलची संख्या आता 9 झाली आहे आणि ती सर्वाधिक आहे. 2021 च्या पालिका निवडणुकीत 25 सदस्यीय मंडळात केवळ सात जागा जिंकणारा भाजप आता नऊ सदस्यांसह मडगाव पालिकेतील सर्वांत मोठा गट बनला आहे. गोवा फॉरवर्डच्या नगरसेविका श्वेता लोटलीकर या 2022 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये सामील झाल्या होत्या.
नगराध्यक्ष बदल जवळ पोहोचल्याने निर्णयाला महत्त्व
गोवा फॉरवर्ड पक्षाचा पाठिंबा असलेले मडगाव पालिकेचे नगराध्यक्ष लिंडन पेरेरा यांचा 15 महिन्यांचा कार्यकाळ या महिन्याच्या अखेरीस संपत असल्याच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाला महत्त्व आहे. आमदार दिगंबर कामत आणि आमदार विजय सरदेसाई यांच्यातील समझोत्यानुसार, लिंडन यांना 15 महिने नगराध्यक्षपद भूषवल्यानंतर पद सोडावे लागणार असून कामत यांच्या पॅनलमधील एका नगरसेवकाने नगराध्यक्षपदाचा कारभार हाती घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 25 सदस्यीय मंडळात भाजप गटाकडे आता नऊ नगरसेवकांचा पाठिंबा आहे. त्यानंतर गोवा फॉरवर्ड 8, दिगंबर कामत गट 7 आणि एक स्वतंत्र नगरसेवक घनश्याम शिरोडकर अशी स्थिती आहे.