नवी दिल्ली / वृत्तसंस्था
साहित्य क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित संस्था अशी ओळख असणाऱ्या साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदी हिंदी साहित्यिक माधव कौशिक यांची निवड करण्यात आली आहे. पाच वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी 2018 मध्ये प्रा. चंद्रशेखर कंबार यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा आली होती. यंदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी कौशिक यांच्यासह प्रसिद्ध मराठी लेखक रंगनाथ पठारे आणि कन्नड साहित्यिक मल्लापुरम व्यंकटेश यांच्यात लढत होती. साहित्य अकादमीच्या कार्यकारिणीच्या 97 सदस्यांनी निवडणुकीत मतदान केले.
साहित्य अकादमीच्या अध्यक्षपदासाठी शनिवारी सकाळी निवडणूक झाली. यात माधव कौशिक यांचा विजय झाला आहे. या निवडणुकीत मराठी साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी जोरदार प्रचार केला होता. मात्र, अध्यक्षपदी निवडून येण्याची त्यांची संधी हुकली. आता माधव कौशिक सूत्रे सांभाळणार आहेत. माधव कौशिक यांचा जन्म 1 नोव्हेंबर 1954 रोजी हरियाणातील भिवानी शहरात झाला. हिंदी कविता, कथा, बालसाहित्य, गझल या क्षेत्रात त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे.