नागेश कुकुनूर यांची सीरिज
दिग्दर्शक नागेश कुकुनूर यांच्या सायकोलॉजिकल थ्रिलर वेबसीरिज ‘मिसेस देशपांडे’मध्ये माधुरी दीक्षित महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. माधुरीने स्वत:चा प्रभावी अभिनय तसेच नृत्यकौशल्याने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. परंतु मिसेस देशपांडे या सीरिजमध्ये माधुरीला एका वेगळ्या व्यक्तिरेखेत पाहणे प्रेक्षकांसाठी अत्यंत अनोखा अनुभव ठरणार आहे.
2020 मध्ये द फेम गेम या सीरिजसोबत ओटीटीवर पदार्पण करणारी माधुरा आता ‘मिसेस देशपांडे’मध्ये दिसून येणार आहे. या आगामी सीरिजमध्ये ती एका सीरियल किलरची भूमिका साकारणार असल्याचे समजते. पोलीस एका सीरियल किलरची मदत घेत दुसऱ्या सीरियल किलरला पकडू पाहत असल्याचे या सीरिजमध्ये दाखविले जाणार आहे. सीरियल किलरची हत्या करण्याची पद्धत समजून घेण्याच्या प्रयत्नाभोवती याची कहाणी गुंफण्यात आली आहे.
या सीरिजमध्sय माधुरीच्या चाहत्यांना नकारात्मक छटा असलेली भूमिका पाहता येणार आहे. नागेश कुकुनूर यांना ‘मॉडर्न लव हैदराबाद’ तसेच ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ च्या वेबसीरिजसाठी ओळखले जाते. माधुरी लवकरच ‘भूल भुलैया 3’ या चित्रपटात कार्तिक आर्यन, विद्या बालन आणि तृप्ति डिमरीसोबत दिसून येणार आहे. या चित्रपटात माधुरीचे नृत्यकौशल्य प्रेक्षकांना पाहता येणार आहे. हा चित्रपट दिवाळीच्या काळात प्रदर्शित होणार आहे.