वृत्तसंस्था/ बेंगळूर
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील येथे सुरू असलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात शुक्रवारी खेळाच्या चौथ्या दिवशी मध्य प्रदेश संघाने आपली वाटचाल विजयाकडे केली आहे. मध्य प्रदेशने बंगालला विजयासाठी 350 धावांचे आव्हान दिल्यानंतर बंगालची दुसऱया डावातील स्थिती 4 बाद 96 अशी झाली आहे.
या सामन्यात मध्य प्रदेशने पहिल्या डावात 341 धावा जमविल्यानंतर बंगालने पहिल्या डावात 273 धावा केल्याने मध्य प्रदेशला 68 धावांची आघाडी मिळाली. मध्य प्रदेशने 2 बाद 163 या धावसंख्येवरून शुक्रवारी खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांचा दुसरा डाव 114.2 षटकांत 281 धावांत आटोपला. रजत पाटीदारने 11 चौकारांसह 79 तर कर्णधार श्रीवास्तवने सहा चौकारांसह 82 धावा जमविल्या. बंगालतर्फे शाहबाज अहमदने 79 धावांत 5 तर प्रामाणिकने 65 धावांत 4 गडी बाद केले. मध्य प्रदेशने बंगालला विजयासाठी 350 धावांचे आव्हान दिल्यानंतर बंगालची दुसऱया डावात स्थिती 4 बाद 96 अशी केविलवाणी झाली आहे. कर्णधार ईश्वरन 52 धावांवर खेळत आहे. बंगालला विजयासाठी 254 धावांची जरूरी असून त्यांचे सहा गडी खेळावयाचे आहेत. मध्य प्रदेशतर्फे कुमार कार्तिकेयने 35 धावांत 3 तर जैनने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक ः मध्य प्रदेश प. डाव सर्वबाद 341, बंगाल प. डाव सर्वबाद 273, मध्य प्रदेश दु. डाव सर्वबाद 281 (पाटीदार 79, श्रीवास्तव 82, शाहबाज अहमद 5-79, प्रामाणिक 4-65), बंगाल दु. डाव 37 षटकांत 4 बाद 96 (ईश्वरन खेळत आहे 52, कार्तिकेयन 3-35).