वृत्तसंस्था/ चेन्नई
होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक डॉक्टरांनी ऍलोपॅथिक औषधे लिहून दिल्यास तो गुन्हा ठरणार नाही, असे मद्रास उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे या दोन्ही वैद्यकीय प्रकारांच्या डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात एका डॉक्टरवर दाखल करण्यात आलेला गुन्हा न्यायालयाने रद्द ठरविला आहे.
येथील होमिओपॅथिक डॉ. सेंथिलकुमार यांच्या क्लिनिकवर तामिळनाडू सरकारच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी धाड टाकली होती. या धाडीत त्यांना ऍलोपॅथिक औषधे सापडली होती. तसेच डॉ. सेंथिलकुमार हे आपल्या रुग्णांना ऍलोपॅथिक औषधेही घेण्याचा सल्ला देत होते, असे चौकशीत आढळून आले होते. त्यामुळे डॉ. सेंथिलकुमार यांच्यावर गुन्हेगारी स्वरुपाचा खटला दाखल करण्यात आला होता. त्याविरोधात त्यांनी मद्रास उच्च न्यायालयात दाद मागितली होती.
होमिओपॅथिक तसेच आयुर्वेदिक अभ्यासक्रमात ऍलोपॅथी औषध शास्त्राचाही समावेश असतो. त्यामुळे त्यांना ऍलोपॅथिक औषधे देण्याचा अधिकार आहे, अशी बाजू डॉ. सेंथिलकुमार यांच्यावतीने मांडण्यात आली होती. आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक प्रमाणेच सिद्ध आणि युनानी तसेच नॅचरोपॅथी आदी उपचारपद्धतींनाही राज्य सरकारची मान्यता आहे. तामिळनाडू सरकारने जारी केलेल्या सक्मर्युलरनुसार या सर्व प्रकारच्या उपचारपद्धती वापरणाऱया डॉक्टरांच्या कार्यपद्धतीत हस्तक्षेप करू नये, असा आदेश पोलिसांना देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. सेंथिलकुमार यांच्या विरोधात करण्यात आलेली गुन्हेगारी स्वरुपाची कारवाई योग्य ठरत नाही, असे मद्रास उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
2010 मध्ये देखील मद्रास उच्च न्यायालयाने अशाच स्वरुपाचा निकाल दिला होता. अधिकृत वैद्यकीय उपचारकर्त्याला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार औषधे सुचविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे अन्य औषधोपचार पद्धतींच्या डॉक्टरांनी ऍलोपॅथिक औषधे घेण्याचा सल्ला दिला तरी तो अवैध मानला जाऊ शकत नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या कार्यपद्धतीत हस्तक्षेप करू नये, असे स्पष्ट करण्यात आले.