रोमनकाळात जादूटोण्यासाठी वापर
तुर्कियेच्या एका पुरातत्व स्थळावर अनोखा शोध लागला आहे. माणसांचे पूर्वज जादूमध्ये खूप आधीपासून विश्वास ठेवत असल्याचे या शोधातून समोर आले आहे. रोमन काळात लोकांना मृत लोक पुन्हा जिवंत होण्याची भीती सतावत होती असे एका नव्या अध्ययनातून समोर आले आहे. दक्षिण-पश्चिम तुर्कियेत सगलासोसमध्ये एका स्मशान मकबऱयाचा शोध लागला आहे. हा मकबरा ईसवी सन 100-150 या कालावधीतील आहे. मकबऱयातून 41 वळविलेले खिळे, 24 विटा आणि मकबरा सील करण्यासाठी चुन्याच्या प्लास्टरचे एक आच्छादन मिळाले आहे. एका प्रौढ पुरुषाचे अवशेष त्या ठिकाणी दफन करण्यात आले होते. रोमन युगातील ही एक असामान्य प्रथा होती.
याच्याशी निगडित अध्ययन एंटीक्विटी या नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. त्यांना स्मशानभूमीत मृतदेह जाळण्याच्या ठिकाणी वाकविलेले खिळे मिळाले आहेत. ज्या पुरुषाचे अवशेष मिळाले आहेत, त्याच ठिकाणी त्याला जाळण्यात आले होते आणि अवशेष तेथेच पुरण्यात आले होते. अशाप्रकारची प्रथा रोमन काळात सामान्य नव्हती. याचे अवशेष एक नव्हे तर तीन वेगवेगळय़ा पद्धतींनी दफन करण्यात आले होते. मृत लोक पुन्हा जिवंत होतील अशी भीती त्या काळात लोकांना सतावत असावी असे अध्ययनाचे लेखक जोहान क्लेयस यांनी म्हटले आहे.
हे पुरातत्व स्थळ रोमन युगाशी निगडित अनेक रहस्य सामावून आहे. रोमन युगात मृतदेह जाळण्यात यायचे आणि मग अवशेष दफन केले जात होते. तर मिळालेल्या अवशेषांतून संबंधितावर अंत्यसंस्कार त्याच ठिकाणी झाला होता असे आढळून आले. कब्रमधून एक टोपली, भोजनाचे अवशेष, एक नाणी, चिनी माती आणि काचेची भांडी मिळाली आहेत. त्या काळात स्वतःच्या आप्तांना निरोप देण्याची ही पद्धत राहिली असावी असे मानले जात आहे.
संशोधकांना खिळय़ाविषयी कुठलीच माहिती मिळविता आलेली नाही. रोमन कब्रांमध्ये पूर्वीही अशाप्रकारचे खिळे मिळाले आहेत. परंतु हा कशासाठी वापरला जायचा हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा खिळा शवपेटी किंवा कब्रमधील अन्य गोष्टींचा हिस्सा नाही. या खिळय़ांचा वापर जादूटोण्याकरता केला गेला असावा असे संशोधकांचे मानणे आहे.