परवानगीसाठी म. ए. समितीचे पोलीस आयुक्तांना पत्र
प्रतिनिधी/ बेळगाव
मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी हलगा येथे सुवर्णविधानसौध बांधण्यात आले. दरवर्षी या ठिकाणी अधिवेशन भरविले जाते. या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने महामेळावा भरविला जातो. यावेळीही अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी (19 डिसेंबर रोजी) महामेळावा होणार असून, यासंदर्भात परवानगीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने पोलीस आयुक्तांना पत्र पाठविण्यात आले.
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकी यासह इतर मराठी भाषिकांवर अन्याय करत त्यांना म्हैसूर प्रांतात डांबण्यात आले. 1956 पासून मराठी भाषिकांचा अन्यायाविरुद्धचा लढा सुरू आहे. 865 गावे एका निर्णयामुळे मागील 66 वर्षांपासून अन्याय सहन करत आहेत. यातच कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रकार वारंवार होतो. मराठी भू-भागावर आपला हक्क दाखविण्यासाठी कर्नाटक सरकारकडून बेळगावला उपराजधानीचा दर्जा देत हलगा येथे सुवर्णविधानसौध बांधण्यात आले.
मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी सुवर्णसौध बांधण्यात आल्याने याविरोधात मराठी भाषिकांकडून महामेळावा आयोजित केला जातो. महामेळाव्यातून अधिवेशनाला आपला विरोध दर्शविला जातो. महाराष्ट्रातून अनेक नेतेमंडळी महामेळाव्यासाठी निमंत्रित केले जातात. आजवर मराठी भाषिकांनी दाखविलेल्या एकीमुळेच सर्वच महामेळावे यशस्वी झाले आहेत.
यावषी कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन दि. 19 ते 30 डिसेंबर दरम्यान बेळगावमध्ये होणार आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवार दि. 19 रोजी महामेळावा घेतला जाणार आहे. टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदान परिसरात महामेळावा होणार असल्याची माहिती मध्यवर्ती म. ए. समितीच्यावतीने पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे देण्यात आली आहे.