Tarun Bharat

महाविकास आघाडी विरूध्द महायुती

दीपावलीच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या दीपोत्सवाला राज ठाकरे यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येत राज्यात भविष्यात महाविकास आघाडीच्या विरोधात महायुती निर्माण होण्याचे संकेत दिले आहेत. आता महाराष्ट्रात यापुढील सर्व राजकीय लढाया या महाविकास आघाडी विरूध्द महायुती अशीच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत हे चित्र बघायला मिळाले असते. मात्र भाजप उमेदवाराने या निवडणुकीतून माघार घेतल्याने महायुती विरूध्द महाआघाडीचा सामना, त्यात शिंदे विरोधी उध्दव ठाकरे गट असा राजकीय सामना बघायला अजून काही काळ वाट बघावी लागणार आहे.

बरोबर तीन वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर शिवसेना-भाजप युतीला जनतेने स्पष्ट बहुमत दिल्यानंतर राज्यात युतीचे सरकार येणार हे जवळपास निश्चित झाले होते. मात्र शिवसेनेकडून सत्तावाटपात समान मागणी आणि अडीच वर्ष मुख्यमंत्री पद या मागणीवरुन दिवाळीत काय हे सत्तासमीकरण जुळत नव्हते. त्यातच †िदवाळीच्या निमित्ताने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना वर्षा या निवासस्थानी स्नेह भोजनासाठी बोलवले होते, त्यावेळी फडणवीस यांनी भाजपला सर्व पर्याय खुले असल्याचे वक्तव्य करताना शिवसेनेवर दबावतंत्राचा वापर केला. फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर मात्र ठाकरे यांनी फडणवीसांचे फोन उचलणे बंद केले आणि भाजपला बाहेर ठेवून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडी स्थापन करत राज्यात सत्ता स्थापन केली. आता बरोबर तीन वर्षानंतर पुन्हा सत्तांतर झाले असून या दिवाळीत राज्यात बाळासाहेबांच्या शिवसेनेची दोन शकले झाली असून एक शिंदेंची शिवसेना भाजपसोबत महायुतीसोबत आहे तर उध्दव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडीत आहे.

दीपावलीच्या निमित्ताने मनसेच्यावतीने शिवाजीपार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवात दिवाळीच्या पहिल्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिरपणे एकत्र हजेरी लावताना राज्यात नव्या राजकीय समीकरणाचे संकेत दिले. राजकारणात काहीही अशक्य नसते हे राज्यात तीन वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीच्या निमित्ताने दिसून आले. या दीपोत्सव कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की मागील अनेक वर्षे येथे येण्याची इच्छा होती. पण येता आले नाही. पण आता योग जुळून आला, शिंदेंचा रोख हा कोणाकडे होता आणि का आलो नाही हे कळण्याइतपत जनता दुधखुळी नाही. त्यामुळे राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय योग जुळून येत आहेत आणि पुढील अडीच वर्षे ते येत राहतील यात शंका नाही.

शिवसेनेला मशाल निशाणी आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे पक्षाला नाव मिळाल्यानंतर उध्दव ठाकरे यांना अंधेरी पोटनिवडणुकीसाठी अनेक पुरोगामी पक्षाचा पाठिंबा मिळाला, जे कधी काळी शिवसेनेच्या विरोधात होते. त्यात कम्युनिस्ट पक्षाने अंधेरी निवडणुकीसाठी उध्दव ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. म्हणजेच उध्दव ठाकरे यांना जहाल हिंदुत्वाची भूमिका सोडताना प्रबोधनकारांच्या हिंदुत्वाच्या विचारांवर जायचे ठरवल्यानंतर पुरोगामी नेतृत्व हे ठाकरे यांच्याजवळ येताना दिसत आहे. जे पक्ष कधी काळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत होते, ते पक्षही भविष्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडताना दिसत असून ते शिवसेनेला पाठिंबा दिल्यास आश्चर्य वाटणार नाही. त्यामुळे महाआघाडीत काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा पुरोगामी पक्षांना शिवसेना जवळची वाटू लागली आहे. काँग्रेससोबत गेली 15 वर्षे मित्र असलेल्या पिपल्स रिपब्लिकन पक्षाच्या प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी काँग्रेससोबत आघाडी संपुष्टात येत असल्याचे बोलताना, काँग्रेसवर विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे भविष्यात कवाडे शिवसेनेसोबत गेल्यास मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीलाही आत्मचिंतन करावे लागणार आहे.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या दहा दिवसापूर्वी 13 ऑक्टोबरला मुंबईत झालेल्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह, शरद पवार, बाळासाहेब थोरात, फारूख अब्दुल्ला तसेच ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निमंत्रण असताना या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. हे पाहता, राज्यात आता यापुढे सरळ सरळ महाविकास आघाडी विरूध्द महायुती अशीच लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला मशाल निशाणी मिळाल्यानंतर ज्या पध्दतीने भुजबळ यांनी स्वतः मशाल निशाणी घेऊन आपण कसे लढलो आणि शिवसेनेचे आमदार झालो हे सांगताना दिसत आहेत.

मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर मनसे, बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप महायुतीची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. याला भाजपच्या नेत्यांकडून जर पुष्टी दिली जात असली तरी भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यात उत्तर भारतीयांच्या विरोधात राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकांचा तोटा उत्तर भारतात भाजपला होऊ शकतो. त्यामुळे थेट भाजपशी युती न करता शिंदे गटाबरोबर भाजप जाऊ शकते. अद्यापही राजाश्रय हे उध्दव ठाकरे यांच्यासोबत असल्याने आणि भाजप मराठी विरोधी भूमिका घेत असल्याचा सततचा प्रचार त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भाजपच्या मराठी विरोधी भूमिकेला पाठींबा असल्याचा विरोधी पक्षाने केलेले प्रचार पाहता मराठी मतांसाठी महायुतीत कोणी तरी घटक असणे गरजेचे आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचे महत्त्व वाढविण्याचे काम भाजप आणि शिंदेंकडून होत असल्याचे महाविकास आघाडीचे नेते बोलत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंधेरी पोट निवडणूक बिनविरोध होण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आणि फडणवीस यांनी उमेदवारी मागे घेताना राजकीय परंपरा कायम ठेवली. त्यामुळे काही दिवसापूर्वी स्वबळाचा नारा दिलेली मनसे स्वबळावर निवडणूक लढणार का? की महायुतीत सहभागी होणार हे दिवाळीनंतरच कळेल.

प्रवीण काळे

Related Stories

कोरोना फैलावामुळे ‘ऑनलाईन’च्या कक्षा रुंदावणार

Patil_p

आपण ‘प्रामाणिक’ आहोत का ?

Patil_p

महाराष्ट्रापुढे कसोटीचे डोंगर

Patil_p

एकवटलेल्या आतल्या आवाजाची किमया

Patil_p

‘डब्ल्यूएचओ’ची पटकथा!

Patil_p

क्षत्रियांची स्वधर्मनिनिष्ठा

Patil_p