Tarun Bharat

नवरात्रोत्सवातील एक कुळाचार महालक्ष्मी पूजन

Advertisements

प्रतिनिधी/ पणजी

नवरात्र हा एक प्रकारे स्त्री शक्ती जागविण्याचा उत्सव आहे. यातील प्रत्येक तिथीला, देवी विविध रूपामध्ये अवतरते. त्यातील एक रूप म्हणजे अष्टमीच्या दिवशी पूजा केली जाणारी महालक्ष्मी. आज दि. 2 रोजी गोव्यात विविध ठिकाणी महालक्ष्मी पूजन करण्यात येणार आहे. या महालक्ष्मी पूजनाचा एक अत्यंत वेगळा प्रकार प्रामुख्याने गोव्यात पाहायला मिळतो. बहुतांश ठिकाणी हा कुळधर्म म्हणून पाळला जातो. तांदळाच्या पिठाच्या उकडीपासून देवीचा मुखवटा साकारून त्याची पूजा करण्याचे हे व्रत केले जाते. लग्न झाल्यावर स्त्रिया पहिली पाच वर्षे हे व्रत करतात. हे व्रत करणाऱया स्त्रिया ही पूजा एकत्रितपणे करतात.

 सात खडे व तातूंची केली जाते पूजा

नवरात्रीतील अष्टमीला सकाळी देवीची धातूची मूर्ती, दुर्वांचा एक तातू, एक रेशमी तातू यांची पूजा करतात. त्याचबरोबर सात खडय़ांची पूजा केली जाते. सात खडे हे सात आसरा, म्हणजे जलसाठय़ांजवळ वास करणाऱया देवता मानल्या जातात. या देवता अशुभ, अरिष्टांपासून रक्षण करून समृद्धी देतात अशी पूर्वापार श्रद्धा आहे. या पूजेत वापरल्या जाणाऱया रेशमी तातूला लग्नानंतर कितव्या वर्षींची पूजा आहे, त्यानुसार एक ते पाच गाठी बांधतात. पूजा झाल्यावर हा रेशमी तातू हातावर बांधतात.

महालक्ष्मीच्या मुखवटय़ाचे विशेष असते आकर्षण

महालक्ष्मीच्या या पूजेतील देवीचा मुखवटा तयार करण्याचा विशेष भाग हा सायंकाळी सुरू होतो. सुमारे 1 किलो तांदळाच्या पिठाची उकड काढून ती उत्तम प्रकारे मळून घेतली जाते. या उकडीपासून देवीचा मुखवटा बनविला जातो. हा मुखवटा पुरुषच बनवितात. तेथे स्त्रियांना प्रवेश नसतो. नंतर विविध आकाराचे हंडे, कळशा यांचा मानवी उंचीचा आकार उभारून त्यावर हा मुखवटा बसवितात. विविध वस्त्रे, अलंकार घालून महालक्ष्मीची सुंदर मूर्ती उभी केली जाते. सकाळी या व्रताची पूजा केलेल्या स्त्रिया हातावर बांधलेला तातू आणि पूजा केलेले सात खडे, या देवीपुढे ठेवून या सर्वांची पूजा करतात. यानंतर देवीपुढे घागरी फुंकणे हा अतिशय वेगळा असा एक कार्यक्रम असतो. विस्तवावर धूप जाळून होणाऱया धुरावर, उपडी घागर धरून त्यात धूर भरला जातो. नंतर अशा घागरीमध्ये फुंकर मारीत, ती घागर नाचवित देवीपुढे नृत्य केले जाते, फेर धरला जातो. प्रत्येकीने किमान पाच वेळा तरी घागर फुंकावी असा प्रघात आहे. यानंतर देवीची भजने, गीते, आरत्या म्हणत जागर केला जातो. अन्य सर्व स्त्री, पुरुषांना देवीचे दर्शन घेता येते. रात्री बारा वाजल्यानंतर देवीची आरती केली जाते. पहाटे या मुखवटय़ाचे पाण्यात विसर्जन केले जाते.

 महालक्ष्मी व्रत पूजनाची परंपरा अजूनही टिकलेली

गेल्या शेकडो वर्षांपासून अशा पद्धतीने महालक्ष्मी व्रत पूजनाची परंपरा अविरतपणे सुरू आहे. काळ जरी बदलला असला तरी अजूनही ठिकठिकाणी नवरात्रात महालक्ष्मी पूजनोत्सव पारंपारिकरित्या केले जाते. विशेषतः कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये हा कुळाचार केला जातो. सार्वजनिकरित्या महालक्ष्मी पूजन तर केले जातेच. याशिवाय अजूनही गोव्यात घरांमध्येही महालक्ष्मी पूजन केले जाते आणि त्यासाठी वशिऱया म्हणजेच ज्यांची महालक्ष्मी पूजनाची वर्षे आहेत त्या आवर्जून यात सहभागी होतात.

Related Stories

युद्ध, आपत्तकालीन मृतांची ओळख पटविण्यासाठी ‘ऍक्शन प्लॅन’ची गरज

Amit Kulkarni

कोरोना रोखण्यासाठी ‘दिल्ली मॉडेल’ राबवणार

Patil_p

गोवा फेणी धोरणाचे संघटनेकडून स्वागत

Omkar B

वास्को मुरगावातील उड्डाण पुलाच्या कामाची समस्या केंद्रीयमंत्र्यासमोर मांडली

Patil_p

गांधी मार्केट, न्यू मार्केट सुरू झाल्याने ग्राहकांची सोय

Omkar B

45 वर्षांवरील प्रत्येकाने लस घ्यावी

Patil_p
error: Content is protected !!