मुंबई \ ऑनलाईन टीम
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता महाराष्ट्र सरकारनं बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागानं शासन निर्णय काढून बारावी निकालाचा फॉर्म्युला प्रसिद्ध केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीबीएसई मंडळाप्रमाणे बारावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या सूत्रावर आधारित असणार आहे.
महाराष्ट्र सरकारनं बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेला आहे. दहावी साठी ३० टक्के, अकरावी साठी ३० टक्के आणि बारावीसाठी ४० टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या सूत्रानुसार मूल्यमापन करण्याचे आदेश महाविद्यालयांना देण्यात येतील.
दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या ३ विषयांचे सरासरी गुण ३० टक्के, अकरावीच्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय गुण ३० टक्के, इयत्ता बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनातील प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन गुण ४० टक्के असे निकष ठरवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक महाविद्यालयाकडून निकलासाठी मुख्याध्यापक /प्राचार्य यांच्यासह कमाल ७ सदस्य असलेली निकाल समिती स्थापन करण्यात येईल. निकालासंबंधित सविस्तर वेळापत्रक मंडळाकडून लवकरच जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

