Sanjay Raut on Maharashtra Karnataka Border Dispute : राज्यातील आणि केंद्रातील सरकारच्या प्रेरणेनंच बेळगावात हिंसाचार सुरू आहे.महाराष्ट्रात सरकार आहे की नाही असा प्रश्न निर्माण झालाय.महाराष्ट्राच्या अस्मितेचं,सार्वजनिक मालमत्तेचं आणि जमिनीचं रक्षण करण्यात हे सरकार अपयशी ठरलंय,त्यांना एक क्षणही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही.अशी खरमरीत टिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. काल महाराष्ट्रातील वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेकडून दगडफेक करण्यात आली. यावरून राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारचा समाचार घेतला. आज ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री स्वत:ला भाई म्हणवून घेतात.आता भाईगिरी दाखवा असे आव्हान राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले. सीमाभागातील जनतेसाठी एसेम जोशी, बाळासाहेब ठाकरे, नानासाहेब गोरे, शरद पवार, एनडी पाटील अशा दिग्गजांनी आयुष्य वेचलंय. आज हा महाराष्ट्र पुन्हा तोडण्याचं कारस्थान सुरू असताना राज्यातील सरकार षंड आणि नामर्दांसारखं बसून आहे. या सरकारमध्ये मर्दानगी असती तर कर्नाटकनं मर्यादा ओलांडली नसती असेही ते म्हणाले. इतकं हतबल सरकार मागच्या ६० वर्षांत कधी झालेलं नाही. डरपोक सरकार आहे. या सरकारला जनतेची, सीमेची काळजी नाही, अशी टीका राऊत यांनी केली.

