भाजपतर्फे ५ लाखाचा चेक प्रदान
कोल्हापूर प्रतिनिधी
तब्बल २१ वर्षानंतर कोल्हापूरला महाराष्ट्र केसरीचा मानाचा बहुमान मिळाला असून, हा मान मिळवून देणार्या पैलवान पृथ्वीराज पाटील याने कुस्ती पंढरी कोल्हापूरची शान उंचावलीय, असे प्रशंसोद्गार आज भाजप प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांनी काढले. पृथ्वीराजचे ऑलिंपिक पदक विजेता होण्याचे स्वप्न भाजप आणि महाडिक परिवार नक्कीच पूर्ण करेल, असेही महाडिक यांनी नमुद केले. पृथ्वीराज पाटील याचा सत्कार आणि ५ लाख रूपये बक्षिस प्रदान सोहळ्यात ते बोलत होते.
लोकराजा राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांनी लाल मातीतील कुस्तीला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यामुळे करवीर नगरीला आजही कुस्ती पंढरी म्हणून ओळखले जाते. सातारा इथे नुकत्याच झालेल्या कुस्ती स्पर्धेत पन्हाळा तालुक्यातील देवठाणे गावचा सुपूत्र आणि मुंडे तालमीचा मल्ल पृथ्वीराज पाटील याने विशाल बनकरवर मात करून, महाराष्ट्र केसरी गदेवर कोल्हापूरचे नाव कोरले. त्याच्या यशाबद्दल भाजपच्यावतीने सर्वप्रथम ५ लाख रूपयांचे बक्षिस जाहीर केले होते. या रकमेचा धनादेश आज भाजप प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांच्या हस्ते पृथ्वीराजला देण्यात आला. महाडिक यांच्या संपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात महाडिक यांनी, पृथ्वीराजची मुक्त कंठानं प्रशंसा केली. तब्बल २१ वर्षानंतर कुस्ती पंढरीमध्ये महाराष्ट्र केसरीची गदा आणणार्या पृथ्वीराजनं कोल्हापूरचं नाव कुस्ती क्षेत्राच्या जागतिक नकाशावर कोरलंय, अशा शब्दात महाडिक यांनी पृथ्वीराज पाटीलची प्रशंसा केली. महाराष्ट्र केसरी विजेता झाल्यानंतर पृथ्वीराज पाटील याने ऑलिंपिक पदक विजेता होण्याचें स्वप्न पाहीले आहे. त्याचे हे स्वप्न भाजप आणि महाडिक परिवार नक्कीच पूर्ण करेल, अशी ग्वाही धनंजय महाडिक यांनी दिली. पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी विजेता झाल्यामुळे कोल्हापूरच्या कुस्ती क्षेत्राला नवचैतन्य निर्माण झालें आहे. नवोदित मल्लांसाठी पृथ्वीराज प्रेरणास्थान बनलाय, असेही धनंजय महाडिक यांनी नमुद केले. भारतीय जनता पक्षाने सर्वप्रथम जाहीर केल्याप्रमाणे पाच लाख रूपये बक्षिसाचा धनादेश धनंजय महाडिक यांच्या हस्ते सुपूर्द केल्यानंतर पृथ्वीराज पाटील भारावून गेला. महाडिक परिवार आणि भाजपने पाहीलेल ऑलिंपिक पदाचे स्वप्न आपण नक्कीच साकार करू, अशी ग्वाही पृथ्वीराज पाटील याने दिली. यावेळी माजी नगरसेवक सत्यजित कदम, विजय सुर्यवंशी, राजसिंह शेळके यांच्यासह महेश जाधव, संग्राम निकम, वैभव माने, अमृत भोसले, राजाराम मगदुम, सचिन चव्हाण उपस्थित होते.