Tarun Bharat

बंडखोर नेत्यांची कार्यालये टार्गेट

Advertisements

शिवसेना-बंडखोर समर्थकांचा जोरदार राडा ः राज्यात अनेक ठिकाणी संतप्त शिवसैनिकांकडून तोडफोड

प्रतिनिधी/ मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर

राज्यातील सत्तासंघर्षामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे या दोन फुटीच्या राजकारणामुळे राज्यभरातील आक्रमक शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, उस्मानाबाद, कोल्हापूर आदी ठिकाणी तोडफोडीच्या घटना सुरू झाल्या आहेत. ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी राज्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरून बंडखोर नेते, आमदार, खासदारांची कार्यालये, संपर्क कार्यालये टार्गेट केल्याचे चित्र शुक्रवारी रात्रीनंतर आणि शनिवारी दिवसभर होते. शिवसैनिकांनी या नेत्यांना गद्दार संबोधत जोरदार घोषणाबाजी तर केलीच, शिवाय तोडफोडही केली. तोडफोडीच्या या घटना घडल्यानंतर पोलीस यंत्रणा अलर्ट झाली असून बंडखोर नेत्यांची कार्यालये तसेच निवासस्थांनांनाही बंदोबस्त पुरवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी जमावबंदी आदेशही लागू करण्यात आला आहे. दुसरीकडे बंडखोर नेत्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनीही आक्रमक भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे. शिवसैनिकांनी राडेबाजीवर उतरू नये, आमच्या अंगातही शिवसेनेचेच रक्त आहे, जशास तसे उत्तर देऊ, असे प्रतिआव्हान दिले.

एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनीही शक्तीप्रदर्शन करत खरे शिवसैनिक असाल तर समोर येऊन हल्ला करा, पाहून घेऊ, असा सज्जड दम दिला आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई करण्याचे टाळल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ते अजूनही शिवसेना नेते राहणार आहेत. तथापि, शिंदे गटाने ‘शिवसेना बाळासाहेब गट’ या घेतलेल्या नावाला बैठकीमध्ये आक्षेप घेण्यात आला असून बाळासाहेबांचे नाव कोणालाही वापरता येणार नसल्याचा ठराव करण्यात आला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘हिंमत असेल तर स्वतःच्या बापाचे नाव लावून निवडून येऊन दाखवा,’ असा टोला मारला आहे. या बैठकीत एकूण सहा ठराव झाले आहेत.

तर एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही अजूनही शिवसेना सोडलेली नाही. त्यांनी बंदी घातली असली तरी आमच्याकडे संख्याबळ अधिक आहे. यासाठी न्यायालयीन लढाई करण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे.

मुंबईत 10 जुलैपर्यंत जमावबंदी

मुंबईत शिवसेना कार्यकर्ते आणि बंडखोरांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने अनेक ठिकाणी मोठा राडा झाल्याचे चित्र आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची खबरदारी घेत मुंबईत 10 जुलैपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त आणि सहआयुक्त यांनी मुंबईतील सर्व अप्पर पोलीस आयुक्त व सर्व पोलीस उपायुक्तांची बैठक घेतली. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून कायदा आणि सुव्यवस्थेबाबत कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेतला.

कार्यालयांना सुरक्षा वाढविली

मुंबईत कलम 144 लागू झाल्यानंतर एकाच ठिकाणी पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी असणार आहे. लाऊड स्पिकरवर बंदी असेल. आमदार-खासदारांच्या कार्यालयांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. मुंबई पोलिसांची राजकीय बॅनर आणि घोषणांवर नजर असेल. काही अपवाद वगळता कलम 144 च्या निर्बंधातही सूट देण्यात आली आहे.

बंडखोरांची कार्यालये टार्गेट

शिवसेनेतील आमदार एक-एक करून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याने शिवसैनिक संतापले आहेत. त्यामुळे बंडखोर शिवसेना आमदारांच्या कार्यालयांना टार्गेट करून दगडफेकीच्या घटना घडत आहेत. मुंबईतील अनेक बंडखोर शिवसेना आमदारांच्या बॅनरवर काळे फासण्यात आले. तर ठिकठिकाणी निषेध मोर्चे निघाले. त्यामुळे मुंबईत आता जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर पोलिसांची सायबर टीम लक्ष ठेवून आहे. चौकाचौकात बंडखोर आमदारांविरोधात किंवा पाठिंब्यासाठीचे बॅनर-पोस्टर तात्काळ काढण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. त्याचबरोबर सर्व पक्षांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी शांततेचे आवाहन केले आहे.

एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी कडक सुरक्षा

बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या अनेक संदेशांमध्ये रविवारी दुपारी 4 वाजता शिंदे यांचे समर्थक त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी मोठय़ा संख्येने जमणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यादृष्टीने येथील रस्त्यांवर बॅरिकेडिंग करण्यात आले आहे.

पुण्यात तानाजी सावंतांच्या कार्यालयावर हल्ला

पुण्यात संतप्त शिवसैनिकांनी बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयावर हल्लाबोल करत तोडफोड केली. ‘गद्दार सावंत’ असा मजकूर लिहितानाच सावंत यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. तोडफोड केल्यानंतर सावंत यांच्या कार्यालय आणि घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

बालाजीनगरमधील कार्यालय लक्ष्य

बालाजीनगर येथे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या मे. भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडचे कार्यालय आहे. या कार्यालयाला शिवसैनिकांनी लक्ष्य केले. या कार्यालयातील खुर्च्या, टेबल, काचेची तावदाने तसेच अन्य साहित्याची तोडफोड करण्यात आली. याशिवाय कार्यालयाबाहेर व आतमध्ये ‘गद्दार सावंत’ असा मजकूर लिहित त्यांच्या कृतीचा निषेध करण्यात आला. या राडेबाजीमुळे कार्यालयाची दुरवस्था झाली. तर या हल्ल्याबद्दल सावंत यांनी संताप व्यक्त केला आहे. शिंदे यांनी संयम बाळगण्यास सांगितल्याने सध्या गप्प आहोत. मात्र, आल्यावर बघून घेऊ. संबंधितांनी औकातीत रहावे, असा इशारा सावंत यांनी शिवसैनिकांना दिला आहे.

हिम्मत असेल तर समोर या ः श्रीकांत शिंदे

एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर येथील कार्यालयावर हल्ला केल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनीही ठाण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन करत थेट उद्धव ठाकरेंना आव्हान दिले. प्रामाणिक शिवसैनिकांची माथी भडकवण्याचे काम का करता? हिंमत असेल समोर या, असे थेट आव्हान श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिले. शिंदे यांच्या लुईसवाडी निवासस्थानाबाहेर शिंदे समर्थकांकडून मोठय़ा प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

दीपक केसरकरांच्या कार्यालयात दगडफेक

आमदार दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात घुसून कणकवली येथील एका व्यक्तीने शनिवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास दगडफेक केली. तसेच काचा फोडण्याचा प्रयत्न केला. केसरकरांच्या कार्यालयाला पोलीस बंदोबस्त असतानाही दगडफेकीचा प्रकार घडला. केसरकर हे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्यानंतर त्यांची शिंदे गटाच्या प्रवक्तेपदी नियुक्ती झाली आहे. या पार्श्वभूमीवर सावंतवाडी येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात बंदोबस्त असताना तसेच दंगल नियंत्रक पथकही नियुक्त असतानाही हा प्रकार घडला.

मुंबई ः गेल्या पाच दिवसांपासून शिवसेनेतील बंडखोरीमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले असले तरी शनिवारी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यावर कारवाई करण्याचे टाळले गेल्याचे समोर आले आहे. त्यांच्यासह रामदास कदम यांच्यावरही कारवाई केलेली नाही.

या बैठकीमध्ये कारवाईबाबतचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना देण्यात आले असून सध्यातरी शिवसेना ‘वेट ऍण्ड वॉच’ भूमिकेत आहे. शिंदे आणि कदम यांच्यावर कारवाई होईल, अशी चर्चा होती. मात्र, शिंदे यांचे शिवसेना नेतेपद कायम ठेवण्यात आले आहे. तुर्तास एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांना अभय देण्यात आले आहे.

याच बैठकीमध्ये एका ठरावाद्वारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव कोणालाही वापरता येणार नाही, असे ठरवण्यात आले आहे. याबाबत निवडणूक आयोगालाही प्रस्ताव दिला जाणार आहे. शिवसेनेमध्ये नेतेपद, सचिवपद महत्त्वाचे समजले जाते. परंतु एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांना त्या पदावर कायम ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीमधील हा ठराव महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या बैठकीला रामदास कदम, आनंदराव अडसूळ आणि अनंत गीते हे अनुपस्थित होते.

16 आमदारांना नोटीस

बंडखोरांबाबत शिवसेना ऍक्शन मोडवर असताना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी 16 बंडखोर आमदारांना नोटीस बजावली आहे. त्यांना 48 तासांचा अल्टिमेटम दिला असून उत्तर न दिल्यास या आमदारांवर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. त्या 16 आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती. याच मागणीची दखल घेत झिरवळ यांनी ही नोटीस बजावली असून त्यांना 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे शिंदे गटातील बंडखोर आमदार काय भूमिका घेतात? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिंदे गट न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता

शिंदे गटातील आमदार झिरवळ यांच्या नोटिशीला न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे. या नोटिशीबद्दल बंडखोर आमदार भरत गोगावले यांनी म्हटले आहे की, नोटीस देण्यात आली हे खरे आहे. त्यांना उत्तर दिले जाईल. कोर्टात जाण्याची वेळ आली तर ते करावे लागेल. आम्ही लांब आहोत, कोणालातरी घरी नोटीस दिली आहे. आम्ही अजूनही कोणत्या पक्षात गेलेलो नाही. पक्ष सोडलेला नाही. आम्ही बैठकीला का येऊ शकलो नाही? त्याबद्दल उत्तरात सांगू, असे भरत गोगावले यांनी सांगितले.

शिंदेंचा ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट’

बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नाव ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट’ असे नाव ठरले असल्याचे समजते. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांना विचारले असता त्यांनी फक्त शिवसेना हे नाव देणार असल्याचे सुतोवाच माध्यमांशी बोलताना केले. शिंदे गटाने बंडानंतर आपली शिवसेना हीच खरी शिवसेना आहे, असा दावा केला. यासंदर्भात एकनाथ शिंदे विधानसभा उपाध्यक्षांना पत्र पाठवून आपला गट खरी शिवसेना असल्याची मान्यता मिळावी, असा दावा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, शिंदे यांना निवडणूक चिन्ह धनुष्यबाण मिळणार का? व शिवसेना पक्षाचे नाव मिळणार का? याबाबत वेगवेगळय़ा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.

तुमच्या बापाच्या नावाने मते मागा

 हिम्मत असेल तर तुमच्या बापाच्या नावाने मत मागा आणि निवडून या, असा हल्ला शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर केला. शिवसेनेने तुम्हाला सर्वकाही दिले आहे. मात्र, तुम्हाला त्याचा विसर पडला आहे. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची आहे आणि त्यांचीच राहील. त्यांचे नाव वापरू नका, कोण तुम्हाला विचारते ते पाहू, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांना मारला आहे

Related Stories

आता ममतांच्या मागे ED चा फेरा !

Abhijeet Shinde

जीएसटी संकलनात ‘धनो’त्सव

Patil_p

वायू गळती :कंपनीबाहेर ग्रामस्थांची निदर्शने

Patil_p

महाराष्ट्रातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी कमलनाथ नियुक्त

Patil_p

संभाजीराजेंच्या दिल्लीतील सरकारी बंगल्यात शिरलं पाणी

Abhijeet Shinde

संजय कोठारी दक्षता आयोगाचे आयुक्त

Patil_p
error: Content is protected !!