ऑनलाईन टीम / तरुण भारत :
वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबस, बल्क ड्रग पार्क यासारखे प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्याने शिंदे-फडणवीस सरकारवर टीका होत असतानाच आणखी एक प्रकल्प आता महाराष्ट्राच्या हातातून निसटला आहे. केंद्र सरकारकडून ऊर्जा उपकरण निर्मिती झोन प्रकल्प मिळवण्यात महाराष्ट्राला अपयश आलं आहे.
केंद्र सरकारच्या वतीने ऊर्जा उपकरण निर्मिती झोन उभारण्यात येत आहे. त्यासाठी इच्छूक असलेल्या राज्यांकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून 400 कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. हा प्रकल्प मिळण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा आणि तामिळनाडू या आठ राज्यांमध्ये स्पर्धा रंगली होती. या स्पर्धेत मध्यप्रदेश एमआयडीसीने बाजी मारली आहे.
अधिक वाचा : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचा अधिकार आमचाच
या प्रकल्पासाठी 13 एप्रिल 2022 रोजी निविदा मागवण्यात आलेल्या होत्या. 8 जून 2022 ही निविदेची अंतिम तारीख होती. केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाला प्राप्त झालेल्या प्रस्तावांचे मूल्यांकन प्रकल्प व्यवस्थापन एजन्सीद्वारे विभागाने तयार केलेल्या कार्यपद्धतीवर आधारित होते. मात्र, मूल्यमापनामध्ये मध्यप्रदेश एमआयडीसीने सर्वाधिक गुण मिळवल्याने हा प्रकल्प मध्यप्रदेशला देण्याची शिफारस करण्यात आली.